‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान कायम, सुधारित निकषांसह तिसरा टप्पा लवकरच

मुंबई : राज्यातील शाळांना सुंदर व सक्षम बनविण्यासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेले ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान यंदाही सुधारित निकषांसह राबविण्यात येणार आहे. हे अभियान बंद होणार असल्याच्या माध्यमांतील वृत्तांना शालेय शिक्षण विभागाने खोडून काढले असून, २०२५-२६ साठी ८६.६३ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. नवीन उपक्रमांसह या अभियानाचा तिसरा टप्पा राज्यभरात राबविण्यासाठी शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
सुधारित निकषांसह अभियानाची तयारी –
यंदा सुधारित निकषांसह अभियान राबविण्यासाठी सर्व संचालकांशी समन्वय साधून सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश आयुक्त (शिक्षण) यांना देण्यात आले होते. त्यानुसार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी आयुक्त (शिक्षण) यांनी अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून, नवीन उपक्रमांसह हे अभियान लवकरच राज्यभरात राबविले जाणार आहे.
दोन वर्षांत अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद –
गेल्या दोन वर्षांत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाला विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. २०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत हे अभियान १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबवण्यात आले.
या काळात ९५ टक्के शाळांमधील सुमारे दोन कोटी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला. काही उपक्रमांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान मिळवले.२०२४-२५ मध्ये अभियानाचा दुसरा टप्पा २९ जुलै २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबवला गेला. यासाठी १८ नोव्हेंबर २०२४ आणि ९ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये ७३.८२ कोटींची पारितोषिक रक्कम वितरित करण्यात आली. या टप्प्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला.
तिसऱ्या टप्प्याची तयारी जोरात –
२०२५-२६ साठी ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. सुधारित निकष आणि नवीन उपक्रमांसह हे अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा मानस आहे. यामुळे राज्यातील शाळांचे शैक्षणिक आणि भौतिक वातावरण आणखी सुधारण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





