करोना नियंत्रणाचा आढावा घेणार
पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रथमच पुण्यात करोना उपाययोजनांच्या आढावा बैठकीसाठी उद्या येत आहेत. जिल्ह्याच्या या बैठकीला लोकप्रतिनिधींनाही बोलावले आहे. दुपारी 12 वाजता विधानभवनात ही बैठक होणार आहे. पहिल्या बैठकीत ते जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींशी संवाद साधतील. तर दुपारी अडीच वाजता प्रमुख अधिकाऱ्यांसह आढावा घेतील.
31 जुलैला लॉकडाऊनचा कालावधी संपणार असल्याने मुख्यमंत्री आणखी कोणते नवे निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील पहिला करोना रुग्ण पुण्यात नऊ मार्च रोजी सापडला. ही रुग्णसंख्या 50 हजारच्या पुढे गेली. याआधी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुण्यातील परिस्थितीची माहिती घेत होते. तसेच उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हेदेखील स्वत: उपस्थित राहून सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन आदेश देत होते.
मुंबई वगळता पुणे, सोलापूर, नाशिक, ठाणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद या ठिकाणी साथीवर नियंत्रण मिळवण्यात अद्यापही पुरेसे यश आले नाही. विशेषत: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण संख्या वाढत असताना दोन्ही महापालिका मोठ्याप्रमाणावर यंत्रणा राबवत आहे. यासाठी दोन्ही महापालिकांनी मोठ्याप्रमाणावर खर्च केला आहे दुसरीकडे लॉकडाऊनमुळे राज्य सरकारप्रमाणेच महापालिकांचे उत्पन्नही घटले असताना दैनंदिन खर्चाची तोंड मिळवणी करण्याचे संकट दोन्ही महापालिकांपुढे सध्या उभे ठाकले आहे.
त्यातून राज्य सरकारने जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्यसरकारने महापालिकेला 25 टक्के हिस्सा मागितला आहे; परंतु आजपर्यंत झालेला खर्च आणि पुढे मिळणारे उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवणे शक्य नसल्याने राज्यानेच यामध्ये अर्थसहाय्य करावे अशी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. याबाबतची उद्या होणाऱ्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.