मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतल्याचा दावा काँग्रेसने शनिवारी केला. राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी काँग्रेसकडून तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली असली, तरी या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबत त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. काँग्रेसने सांगितले की, ही तक्रार २ जानेवारी रोजी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीशी संबंधित आहे. या मुलाखतीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक वाहतूक सुविधेचा वापर करून माध्यमांना मुलाखत देणे हे आचारसंहितेच्या विरोधात आहे. तसेच, सरकारी यंत्रणांचा संभाव्य गैरवापर झाल्याचीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसने ९ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयुक्तांना अंतिम स्मरणपत्र सादर करत व्हिडिओ पुरावे आणि संबंधित कायदेशीर तरतुदीही जोडल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले. तक्रारीची प्राथमिक छाननी केल्यानंतर हे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे पाठवण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. आयोगाने यासंदर्भात बीएमसी अधिकाऱ्यांना अधिकृत ईमेल पाठवला असून त्याची प्रत तक्रारदारालाही देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसने या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे म्हटले आहे.