पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली आहे. या घटनेत कुठल्याही आरोपीला सूट न देता कठोर कारवाई केली जाईल. कायद्यासमोर सर्व आरोपी सारखेच आहे. विरोधकांनी आमच्यावर गंभीर आरोप केले या आरोपावर आज चपराक बसली आहे.
आता आपटेची कसून चौकशी केली जाईल. या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर ज्यांनी राजकारण केलं तो प्रकार दुर्दैवी आहे. संजय राऊतांना तर ठाण्यातल्या एका विशेष रुग्णालयात पाठवण्याची वेळ आली आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयदीप आपटेच्या अटकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे हा फरार झाला होता. मागील काही दिवसांपासून पोलिस जयदीप आपटेचा शोध घेत होते. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीसही जारी करण्यात आली होती. अखेर त्याला बुधवारी रात्री कल्याणमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
जयदीप आपटेला आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसलळल्याच्या घटनेनंतर जयदीप आपटे सापडत नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात होती. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याला शोधण्यासाठी पोलिसांची पाच पथकं विविध ठिकाणी शोध घेत होती. अखेर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेला जयदीप आपटे अखेर राहत्या घरीच सापडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता आरोपी जयदीप आपटे यांच्या वकिलाने दावा केला आहे की,’त्याला पोलिसांनी अटक केली नसून आपटे सरेंडर झाला आहे.’ तसेच फरार झाल्यानंतर आरोपी जयदीप आपटे हा वकिलांच्या संपर्कात होता. अशी माहिती समोर येत आहे.
नेमकं काय म्हणाले आरोपी जयदीप आपटेचे वकिल
अटकपूर्व जामिनाला न जाता स्वतःहून सरेंडर होणे पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे हे आम्ही उचित समजले. त्यामुळे त्याच हिशोबाने कुटुंबांशी चर्चा करून आज सरेंडर करायचा निर्णय कालच निर्णय झाला होता. बाजारपेठ पोलिसांकडे येईल स्वतःला सरेंडर करेल पुढील न्याय प्रक्रिया होईल असे आजच ठरले होते त्यानुसार हे घडले आहे. जी चुकीची स्टोरी सांगितली जाते तो अंधारामध्ये लपत कुटुंबाला भेटण्यासाठी ते सर्व साफ खोटे आहे. तपास यंत्रणेशी सहकार्य करणे त्याच्यावर झालेले आरोप हे कसे निराधार आहेत हे सांगण्यासाठी तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरे जाणार आहे.
मालवणला गेल्यानंतर कोर्टात हजार केल्यानंतर आम्ही हजर होऊन युक्तिवाद जो करायचा आहे तो केला जाईल. जयदीप आपटेला हजर करण्यासाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. गलिच्छ राजकारण झाले आहे आणि त्यांनी राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. त्यामुळे आणखी काही फाटे फुटू नयेत सर्व शांततेने व्हावे यामागे कुठली लपाछपी करायची नव्हती. शांततेने निर्णय घेऊन त्याला सरेंडर करणे हाच आमच्या पुढे पर्याय होता, असे वकील म्हणाले.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार अशी झाली अटक
जयदीप आपटे काल रात्रीच्या सुमारास आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी येणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना मिळाली होती. सचिन गुंजाळ यांनी सचिन आपटे याला अटक करण्यासाठी दोन पथक तयार केले. एक पथक कल्याण रेल्वे स्थानकात होतं तर दुसरे पथक आपटे याचा बिल्डिंग समोर तैनात करण्यात आले होते. आपटे इमारतीच्या परिसरात येताच रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले.