मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; इर्शाळवाडी दुर्घटनेतील मुलांचे स्वीकारणार पालकत्व

रायगड – जिल्ह्यातील इर्शाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. या घटनेला तीन दिवस उलटून गेले आहेत. तरी अद्याप या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. इर्शाळवाडी भागात जाण्यासाठी कोणताही रस्ता नसल्याने या ठिकाणी मदत कार्य करणे अवघड आहे. मात्र तरी देखील मोठ्या अडचणींचा सामना करत येथे बचाव कार्य केले जात आहे. त्यानंतर आता इर्शाळवाडी दुर्घटनेतील 19 मुलांचे पालकत्त्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे. या मुलांच्या शिक्षणाचा खर्च मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करणार आहेत.
इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. ‘ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.’
‘शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे.’
ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत.
शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.





