मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! आज मुंबईत आझाद मैदानावर होणार भव्यदिव्य शपथविधी सोहळा

Devendra Fadnavis 3.0 | राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत असणारा सस्पेन्स अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आज ५ डिसेंबर रोजी शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. तर राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून ते शपथ घेतील. शपथविधी सोहळ्याची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 22 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे. साधारण 20 हजारांहून अधिक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आहे. अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे हजारो कार्यकर्ते व लाडक्या बहिणींच्या साक्षीने हा समारंभ होईल. दरम्यान, आज फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून तर बाकीचे मंत्री अधिवेशनाआधी शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. Devendra Fadnavis 3.0 |
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचे पत्र
विधिमंडळ पक्षनेता निवडीनंतर फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा करणारे पत्र त्यांना दिले. भाजपसह मित्रपक्ष शिंदेसेना, अजित पवार गट आणि महायुतीला पाठिंबा देणाऱ्या इतर लहान पक्षांनी आपली पत्रे राज्यपालांकडे सादर केली.
निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे निरीक्षकही यावेळी उपस्थित होते. शिंदे यांच्या हस्ते सत्ता स्थापनेबाबतचे पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आले. सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर गुरुवारी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील. Devendra Fadnavis 3.0 |
शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण
आझाद मैदानातील या शपथविधी सोहळ्यासाठी भव्यदिव्य मंचाची उभारणी करण्यात आली आहे. येथे तीन मंच उभारण्यात आले असून १०० फुटी लांबीचा भव्य प्रमुख मंच असणार आहे. त्याशिवाय दुसरा मंच ही १० फुटांचा आहे. तिसरा मंच हा संगीत संयोजनासाठी उभारण्यात आला आहे. प्रमुख मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, इतर राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे.
या सोहळ्यासाठी देशातील उद्योगपती, लाडक्या बहिणी, साधूसंत, कलाकार आदी उपस्थित राहणार आहेत. सुमारे ४० हजार जणांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. दोन हजार व्हीव्हीआयपी पासचे वाटप करण्यात आले आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी राखीव आसन व्यवस्था असणार आहे. Devendra Fadnavis 3.0 |
हेही वाचा:
Rain Alert : IMD कडून ‘या’ 9 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट जाहीर





