Devendra Fadnavis: जय हरी विठ्ठल! मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा संपन्न; धाराशिवचे ‘माने दाम्पत्य’ ठरले मानाचे वारकरी
Devendra Fadnavis: राज्यात चांगला पाऊस, शेतकऱ्यांचे कल्याण आणि समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाकडे घातले साकडं

Devendra Fadnavis: आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगावचे शेतकरी बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने या वारकरी दांपत्याला यंदाचे ‘मानाचे वारकरी’ म्हणून पूजा करण्याचा सन्मान लाभला.
आषाढी एकादशीनिमित्त आज मध्यरात्री ३.०५ वाजताच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.
विठूरायाला आपलं सगळं मागणं माहित असतं. दरवर्षी प्रमाणे यंदाही आमच्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव, महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे असे साकडे विठ्ठलाकडे घातले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर शासकीय महापुजेतील मानाचे वारकरी बाळासाहेब माने यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
बाळासाहेब माने म्हणाले, “मी गेल्या वीस वर्षांपासून एकही आषाढी वारी चुकवलेली नाही. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मला आणि माझ्या पत्नीला शासकीय महापूजेचा मान मिळाला, ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे मनोभावे दर्शन घेता आले, यापेक्षा मोठे भाग्य नाही.”
पंढरपूरमध्ये अलोट गर्दी
या पूजेसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईमुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते. राज्यभरातून आलेल्या हजारो वारकऱ्यांनी आणि भाविकांनी चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपूरच्या मार्गांवर अलोट गर्दी केली आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरु होती. त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
हेही वाचा:





