मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज अकोलेत

अकोले -उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणीचा शुभारंभ बुधवार उद्या सकाळी 9 वाजता धरण स्थळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा मा.आ.वैभवराव पिचड यांनी दिली.
यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार सुजय विखे, माजीमंत्री मधुकरराव पिचड, भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, महिला जिल्हाध्यक्ष सोनाली नाईकवाडी, ज्येष्ठ नेते शिवाजी धुमाळ, हेमलता पिचड, भाजप गटनेते जालिंदर वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, राहुल देशमुख, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, यशवंत आभाळे, संदीप शेटे, आप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, निळवंडे धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित राहणार आहे
पाणी सोडण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण असून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा आनंददायी सोहळा आहे. “आधी पुनर्वसन मग धरण’ ही भूमिका मांडून राज्यात आदर्श पिचड पॅटर्न राबविणारे, एकाच धरणाला चार कालवे काढून राज्यात इतिहास घडवणारे, निळवंडे धरणाचे जनक, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांचे मोठे स्वप्न या निमित्ताने आज पूर्ण होत असून, याचा विशेष आनंद आहे.
निळवंडे धरण प्रकल्पाबरोबर रस्ते, गावांना जोडणारे पूल, आशिया खंडातील सर्वात उंच व मोठा पिंपरकणे पूल, उपसा जलसिंचन योजना, अकोले- 32 गाव पाणी पुरवठा योजना, म्हाळादेवी येथील जल सेतू, आदर्श पुनर्वसन, वीज निर्मिती प्रकल्प, सर्वात मोठे जलसिंचन क्षेत्र, धरणग्रस्तांच्या मुलांना नोकऱ्या, अकोले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आदर्श पुनर्वसन असे अनेक विविध प्रकल्प या माध्यमातून मार्गी लागत आहे.निळवंडे धरण निर्मिती करताना सर्व प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मोठे योगदान देऊन या धरण निर्मितीला सहकार्य केलेले आहे. या धरणासाठी निधी कमी पडू नये, सर्व प्रश्न मार्गी लागावे, यासाठी पिचड यांनी सत्ताधाऱ्याकडे, प्रसंगी विरोधी पक्षाकडे पाठपुरावा केलेला आहे.
=====================





