‘छोटा राजन व माझा डीएनए एकच’

गॅंगस्टर छोटा राजनच्या पुतणीने मागितली पन्नास लाखाची खंडणी

पुणे – कौटुंबिक वादाचे प्रकरण मिटवण्यासाठी गॅंगस्टार छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे आणि तीच्या दोन साथीदारांनी संगनमत करून शहरातील एका व्यक्तीकडे 50 लाखाची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिने संबंधित व्यक्तीवर पिस्तूल रोखत दहाच्या दहा गोळ्या घालण्याची धमकी दिली. इतकेच नव्हेतर छोटा राजन व माझा डीएनए एकच असल्याचे सांगत जीव प्यारा असेल तर सांगितलेले सर्व ऐकण्याचा दमही भरला.

मंदार वायकर आणि धीरज साबळे अशी इतर दोघांची नावे असून, त्यातील साबळे याला पंचवीस लाखांची खंडणी स्वीकारण्यासाठी आला असताना गुन्हे शाखेने अरोरा टॉवर येथे रंगेहात पकडले. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज परिसरातील एका व्यक्तीने पोलीस आयुक्त कार्यालयात खंडणी विभाग येथे येऊन तक्रार दिली होती. त्यांची पत्नी व मेहुणी यांचा कौटुंबिक वाद चालू असून हा वाद मिटविण्यासाठी गॅंगस्टर छोटा राजन यांची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे, मंदार वायकर व धीरज साबळे यांनी संगनमत करून त्याचे विरुद्ध प्रियदर्शनी निकाळजे यांनी संघटनेचे लेटर हेडवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज केला होता.

त्याच तक्रार अर्जाच्या अनुषंगाने प्रकरण मिटवण्यासाठी प्रियदर्शनी निकाळजे, मंदार वायकर व धीरज साबळे यांनी फिर्यादीकडे संगनमताने 50 लाख रुपयाची खंडणीची मागीतली होती. ती देण्यासाठी वारंवार जीवे ठार मारण्याच्या धमक्‍या देण्यात येत होत्या. त्यानुसार धीरज साबळे हा अरोरा टॉवर येथे ठरल्याप्रमाणे शुक्रवारी रात्री 9 वा चे सुमारास फिर्यादी कडून 25 लाख रुपये स्विकारण्यासाठी आला होता. खंडणी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग व सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार सर यांचे मार्गदर्शनाखाली रंगेहाथ पकडले.

छोटा राजन व माझा डीएनए एकच
फिर्यादीची धीरज साबळेच्या सांगण्यानुसार प्रियदर्शनी निकाळजे यांना भेटायला गेला होता. तेव्हा तिने छोटा राजनची मी सख्खी पुतणी आहे, आमचा डीएनए एकच आहे. जीव प्यारा असेल तर मी सांगितलेले ऐक. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातून फोन आला तर मी सांगितल्याशिवाय जायचे नाही. मी पैसे पोहोच झाल्यानंतरच अर्ज मागे घेईल, असा दम भरला. यानंतर तिने हाताखाली काम करणाऱ्या एकाला गाडीतून पर्स आणण्यास सांगितली. त्यातून पिस्तूल काढून फिर्यादीवर रोखली. माझा ऐकले नाही तर यातील दहाच्या दहा गोळ्या घालून ठार मारील अशी धमकी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.