Chhaya Kadam : हिमाचल प्रदेश सरकारकडून छाया कदम यांना विशेष पुरस्कार; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत मानले आभार

Chhaya Kadam : मराठी- हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत अभिनेत्री छाया कदम हे नाव आता परिचयाचे झाले आहे. आता तर छाया कदम यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नावाची ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्यांनी परिधान केलेल्या लूकची बरीच चर्चा झाली होती.
याशिवाय या सोहळ्यात ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट या सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचही कौतुक करण्यात आलं होतं. आता या अभिनेत्रीचं कौतुक हिमाचल प्रदेशातही झालं असून, तिथल्या सरकारने विशेष पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री छाया कदम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्या क्षणाचा खास फोटोही शेअर केला आहे.
याशिवाय त्यांनी स्थानिक पेहरावातील काही फोटोही या पोस्टमधून शेअर केले आहेत. त्यांनी इंन्स्टाग्रामवरून पोस्ट शेअर केली आहे. हा केवळ माझा सन्मान नाही तर, माझ्या महाराष्ट्राचाही सन्मान आहे, असं छाया कदम यांनी म्हटलं आहे. ११ व्या शिमला इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी तर मिळाली. आणि सोबतच ‘लाल’ या माझ्या शॉर्ट फिल्मचे स्क्रिनिंग असल्यामुळे त्या आनंदात अजून भर पडली.
View this post on Instagram
पण या सगळ्या सोबतच एक विशेष गोष्ट अशी घडली की, मी आजपर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेत हिमाचल प्रदेश राज्य सरकारच्या वतीने माझा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या सन्मानाच्या निमित्ताने दाखविण्यात आलेली माझी लहानशी डॉक्युमेंट्री मला भावनिकरित्या सुखावणारी होती. आणि अर्थात हा सन्मान केवळ माझा नाही तर ज्या मातीने माझ्यातला कलाकार घडविला त्या माझ्या महाराष्ट्राचाही आहे.
या फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने हिमाचल प्रदेश आणि शिमलामधील अनेक सांस्कृतिक गोष्टी अनुभवता आल्या. इथली माणसं त्यांचे गोड स्वभाव अनुभवता आले. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे इथल्या लोकांचे सिनेमा कलाकृतीवर असलेले प्रेम अनुभवता आले, अशा भावना छाया कदम यांनी पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा : सचिन पिळगावकरांच्या ट्रोलिंगवर मुलगी श्रियाची प्रतिक्रिया; म्हणाली “माझ्या बाबांना…”





