मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार आणि सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी नुकतेच एका मुलाखतीत हिंदी चित्रपटाच्या सेटवरील एका आश्चर्यकारक अनुभवाचा खुलासा केला. या घटनेत त्यांनी मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका दिल्लीच्या दिग्दर्शकाला जाहीरपणे जाब विचारत त्याची चूक दाखवून दिली आणि मराठी कलाकारांच्या स्वाभिमानाचा सन्मान केला. छाया कदम यांनी सांगितले की, एका हिंदी चित्रपटाच्या सेटवर शूटिंगदरम्यान हा दिग्दर्शक सातत्याने मराठी कलाकारांबद्दल अपमानास्पद टिप्पणी करत होता. “तो दिग्दर्शक माझ्यासमोरच दोन-तीन वेळा बोलला, ‘यार वो मराठी जैसा काम नही करने का… अरे यार वो मराठी ॲक्टर जैसा नही करने का…’ हे ऐकून मला खूप राग आला,” असे छाया यांनी सांगितले. या टिप्पणीमुळे त्यांना स्वतःच्या आणि मराठी कलाकारांच्या अस्मितेचा अपमान झाल्यासारखे वाटले. यानंतर माझ्यातली मालवणी आणि कबड्डी खेळणारी मुलगी जागी झाली आणि त्यांनी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिग्दर्शकाला स्पष्ट शब्दांत विचारले, “ये आप क्या बोल रहे हो? मला वाद घालायचा नाही, पण तू आधी माफी माग. आणि तू ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोयस, ती मराठीतील एक मोठं नाव आहे!” यामुळे सेटवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. छाया यांनी पुढे सांगितले, “मी आयुष्यात बरीच माणसं जोडली आहेत. सेटवरील स्पॉट बॉईज, मेकअप टीम, लाइटिंग स्टाफ सगळे माझ्या ओळखीचे होते. मी त्यांची ‘ताई’ होते आणि ते माझे ‘भाईलोग’. त्यामुळे मी शूटिंग थांबवण्यास सांगितलं, आणि सेटवर सर्वांनी माझं ऐकलं.” छाया यांच्या या ठाम भूमिकेमुळे दिग्दर्शकाला आपली चूक मान्य करावी लागली. त्याने मनापासून माफी मागितल्यानंतरच शूटिंग पुन्हा सुरू झाले. या प्रसंगातून छाया कदम यांनी केवळ स्वतःच्या स्वाभिमानासाठीच नव्हे, तर मराठी कलाकारांच्या अस्मितेचा सन्मान राखण्यासाठीही ठामपणे पाऊल उचलले. त्यांच्या या कृतीने मराठी सिनेसृष्टीच्या गौरवशाली परंपरेचा झेंडा पुन्हा एकदा उंचावला.