प्रतिकूल परिस्थितीला टक्कर देत जिद्दीने छाया ढोप्रे यांनी व्यवसाय केला यशस्वी

श्रीकांत कात्रे
जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत व्यवसायात जम बसविता येतो. छाया ढोप्रे यांनी ते सिद्ध केले. शहराजवळील छोट्या गावात व्यवसाय यशस्वी करण्याचे कसब त्यांनी दाखविले. एक व्यवसाय करतानाच त्याला जोडून दुसरा जोड व्यवसाय करण्याची कल्पनाही त्यांनी यशस्वी केली. त्यातून स्वतःबरोबरच इतर महिलांनाही आर्थिक मदत होऊ शकेल असे त्यांचे नियोजन वेगळे ठरले.
लातूर जिल्ह्यातील सारोळा गावातील छाया श्रीधर ढोप्रे यांचा संघर्ष वेगळाच. शहराजवळच्या गावात एखादा व्यवसाय करायचा म्हणजे अवघडच. कारण गावाजवळच्या मार्केटपेक्षा शहरातील मार्केटला ग्राहकांची पसंती असते. अशा परिस्थितीत त्यांनी नेटाने आपला व्यवसाय यशस्वी केला आहे. सारोळा या तुलनेत लहान असलेल्या गावात साडी सेंटर चालवून महिलांच्या कपड्यांच्या विक्रीच्या व्यवसायत त्यांनी जम बसविला. अर्थातच त्यामागे त्यांचे कष्ट आहेत. जिद्द आहे. चिकाटीने आणि प्रामाणिकपणे व्यावसायाला पुढे नेण्याची उर्मी आहे. साडी सेंटरमध्ये जम बसवत असतानाच आणखी एखादा जोडव्यवसाय असावा, या विचारातून पापड तयार करून विक्री करण्याचे त्यांनी ठरविले. त्यातून केवळ स्वतःलाच नव्हे तर इतर महिलांनाही अर्थार्जन होईल, असे नियोजन केले. स्वतःचा व्यवसाय सांभाळताना बचत गटाच्या अध्यक्षा म्हणून बचत गटातील महिलांसाठी त्याच तळमळीने ते काम करत राहतात. सहा वर्षांपासून त्यांचा महिलांच्याकपड्यांच्या विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.त्यापूर्वी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण व्हायची.
छाया घरकाम करायच्या. काही तरी केले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात कायम घोळत असायचा. कोणताही व्यवसाय करायचा तर शहर जवळ असल्यामुळे मर्यादा होत्या. त्यातून गावात जे मिळत नाही, असा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांनी ठरविले. गावात पीठाची गिरणी होती. स्टेशनरीचे दुकान होते. पण महिलांसाठी असणाऱ्या कपड्यांचे दुकान मात्र गावात नव्हते. ही गरज ओळखून हाच व्यवसाय करावा असे त्यांना वाटले. अर्थातच व्यवसाय कसा करायचा, माल कोठून आणायचा याची माहिती फारशी नव्हती. पण एकदा करायचे ठरविल्यावर त्यांनी अभ्यास सुरू केला. पूर्ण तयारीनिशी त्या व्यवसायात उतरल्या. लातूर शहर जवळच असल्यामुळे तिथूनच साडी परकर, ब्लाऊज, अस्तर असे महिलांना लागणारे सर्व प्रकारचे कपडे आणून गावात विक्री त्यांनी सुरू केली. परिसरात पोलीस वसाहत होती. तसेच इतर छोटी गावे होती. सुरवातीला दुकानाला प्रतिसाद मिळविण्यासाठी त्यांना मोठी धडपड करावी लागली. त्यादरम्यानच माणदेशी फाउंडेशनशी त्यांचा संपर्कआला.
माणदेशीच्या काही वर्कशॉप्समध्येत्यांनी हजेरी लावली.व्यवसाय कसा वाढवायचायाबाबतचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.डीजिटल व्यवहार, मार्केटिंग, अकाउंटस्अशा साऱ्या बाबी त्यांना शिकताआल्या. माणदेशीकडून पाच हजाररुपये बिनव्याजी कर्जही उपलब्ध झाले.साडी सेंटरसंदर्भात अडचणींचा अभ्यासत्यांनी केला. साडी किंवा इतर कपडेजवळच्या शहरात मिळत असल्यानेलोक त्यालाच पसंती देतात, हे लक्षातआल्यावर त्यांनी व्यक्तीगतसंपर्क, संवादातून मार्केटिंगसाठी वेगळे तंत्र अवलंबिले. त्यामुळे सुरवातीला असणारी परिस्थिती बदलत गेली. व्यवसाय चांगला वाढू लागला. महिलांचा प्रतिसाद चांगला मिळायला लागला. या व्यवसायात हळूहळू चांगला जम बसू लागला. पण त्याबरोबरच काही जोड व्यवसाय आसावा, असे त्यांना वाटत होते. माणदेशी फाउंडेशनच्या कार्यालयात गेल्या असताना त्यांनी तेथे पापड तयार करण्याची मशिन पाहिली. उडीद पापड तयार करण्याची मशिन त्यांनी खरेदी केली. त्यामुळे पापड तयार करुनविक्री करण्याचा व्यवसायही सुरू झाला. उडदासह इतर प्रकारचे पापडही तयार होऊ लागले.
मूळ साडी विक्रीचा व्यवसाय सांभाळून ते पापड उत्पादन व विक्रीचा व्यवसाय सांभाळू लागल्या. मात्र, हे सारे एकटीने करण्यापेक्षा बचत गटातील महिलांचीही त्यांनी मदत घेतली. पापड तयार करणे, त्याचे पॅकेजिंग करणे, मार्केटिंग करणे यासाठी महिलांची मदत मिळू लागली. त्या बदल्यात महिलांनाही रोजगार मिळू लागला. पापडाचा दर्जा टिकल्याने हा व्यवसाय हंगामी न राहता बारमाही झाला. पापडाच्या आर्डर्स वाढल्या. ऑर्डर्सप्रमाणे पुरवठा करण्याबरोबरच मालतयार करून ठेवणे आणि त्याचे मार्केटिंग करणे या दोन्ही पद्धतीने पापड व्यवसायानेहीगती घेतली. कापडाचा व्यवसाय तर त्या बघून बघूनच शिकल्या.
या व्यवसायाला मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील काळात हाच व्यवसाय अधिक वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गारमेंटचा मोठा होलसेल व्यवसाय करावा, असे त्यांचे स्वप्न आहे.त्यांना दोन मुले आहेत. एक सातवीत. एक पाचवीत. त्यांन चांगले शिकवून मोठे करायचे आहे. अर्थातच कापड व्यवसाय आणि पापडाचा व्यवसाय हे दोन्ही व्यवसाय सचोटीने करूनच त्यांना प्रगती साधायचीआहे. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्यांनी ठेवली आहे. वास्तविक आपल्या कुटुंबाच्याआर्थिक स्थिरतेचा विचार करताना महिलांचा घरगुती व्यवसाय करण्याकडे कल असतो. मात्र, छाया यांनी या वेगळ्या व्यवसायांचे आव्हान पेलले. एक महिला अशी विचार करू शकते हेच महत्त्वाचे आहे. कारण शहराजवळील गावातील बाजारपेठेच्या मर्यादेचे भान ठेवून आव्हान पेलणे सोपे नव्हते. त्यामुळेच छाया ढोप्रे यांनी गाठलेला हा टप्पा अचंबित करणारा आहे.





