छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल – नक्षलवाद्यांमध्ये चकमक; 8 नक्षलवाद्यांचा खात्मा

Naxal Encounter: शनिवारी छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 8 नक्षलवादी ठार झाले आहेत. जिल्हा राखीव रक्षक (DRG), विशेष टास्क फोर्स (STF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या बटालियन क्रमांक 222 आणि CRPF च्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट ऍक्शन (CoBRA) 202 बटालियन यांनी ही संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजता चकमक सुरू झाली असून रात्री उशिरापर्यंत चकमक सुरु होती.
बस्तरचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे. 1 जानेवारीपासून आजपर्यंत छत्तीसगडमध्ये झालेल्या विविध चकमकीत एकूण 48 नक्षलवादी मारले गेल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च 2026 पर्यंत भारतातून नक्षलवाद्यांचे पूर्णपणे उच्चाटन करणार असल्याचे सांगितले होते. तेंव्हापासून सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे.
गेल्या महिन्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी ठार –
गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले होते, सुरक्षा दलांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. नक्षलवादी प्रताप रेड्डी रामचंद्र उर्फ चालपतीवर 1 कोटी रुपयांचे बक्षीस होते.





