छत्तीसगड: 12 नक्षलवादी ठार, 3 जवान शहीद; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

रायपूर: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून, दंतेवाडा-बीजापूर सीमेवर सुरक्षा दलांशी झालेल्या भीषण चकमकीत जवानांनी १२ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून जप्त करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दुर्दैवाने, या कारवाईत डीआरजी (DRG) चे ३ जवान शहीद झाले, तर २ जवान जखमी झाले आहेत. बस्तर विभागाचे महानिरीक्षक (IG) सुंदरराज पी. यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
IG सुंदरराज पी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत बीजापूर डीआरजीचे हेड कॉन्स्टेबल मोनू वडारी, रमेश सोडी आणि कॉन्स्टेबल दुकारू गोंडे हे तीन शूर जवान शहीद झाले आहेत. गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जवानांचे पथक सातत्याने शोधमोहीम राबवत आहे.
पोलीस अधीक्षक (SP) जितेंद्र यादव यांनी सांगितले की, डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी ९ वाजल्यापासून बीजापूर-दंतेवाडा सीमेवरील वेस्ट बस्तर डिव्हिजन परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. जंगलात शोधमोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. जवानांनी दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरात हे नक्षलवादी ठार झाले.
Chhattisgarh: 7 Maoists, 3 DRG jawans killed in Bijapur clash
Read @ANI story | https://t.co/GIzVqEOqD4#Chhattisgarh #Bijapur #MaoistsKilled pic.twitter.com/sZHguNQjXs
— ANI Digital (@ani_digital) December 3, 2025
मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया –
राज्याचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले की, “आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.” तर गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले, “आज आपल्या शूर जवानांच्या शौर्यामुळे इतिहास लिहिला जात आहे. नक्षलवाद अखेरची घटका मोजत आहे.” त्यांनीही शहीद सैनिकांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.
मोदी-शाह यांच्या ‘स्ट्रॅटजी’चे परिणाम –
अवघ्या ४ दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि एनएसए डोभाल यांच्यासह अनेक मान्यवर डीजीपी परिषदेत सहभागी झाले होते. या बैठकीत नक्षलवादाच्या खात्म्यासाठीच्या रणनीतीवर चर्चा झाली होती, ज्याचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. अमित शाह यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ची अंतिम मुदत यापूर्वीच निश्चित केली आहे.
शस्त्रसाठा जप्त –
एसपी यादव यांनी माहिती दिली की, जवानांनी चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल, ३०३ रायफल आणि दारूगोळा मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. मृत नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. परिसरात शोधमोहीम सुरू असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
खूंखार नक्षलवादी हिडमाचा खात्मा –
देशातील सर्वात धोकादायक नक्षलवादी कमांडरपैकी एक असलेला माडवी हिडमा हा छत्तीसगड-आंध्र प्रदेश सीमेवर १८ नोव्हेंबर रोजी मरेडमिल्ली जंगल परिसरातील चकमकीत मारला गेला. या कारवाईत हिडमाची पत्नी राजे उर्फ रजक्का आणि ४ अन्य नक्षलवाद्यांनाही सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांना हिडमाला संपवण्यासाठी ३० नोव्हेंबरची डेडलाइन दिली होती. या डेडलाइनच्या १२ दिवस आधीच हिडमा मारला गेला.
२६ हून अधिक हल्ल्यांचा मास्टरमाईंड:
हिडमा हा गेल्या २ दशकांत झालेल्या २६ हून अधिक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा मास्टरमाईंड होता. यात २०१० चा दंतेवाडा हल्ला (७६ सीआरपीएफ जवान शहीद), २०१३ चा झीरम घाटी हल्ला आणि २०२१ चा सुकमा-बीजापूर हल्ला यांचा समावेश आहे.
याआधीचे मोठे नक्षल एन्काउंटर्स –
१६ नोव्हेंबर: भेज्जी-चिंतागुफाच्या सीमावर्ती भागात झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले होते.
११ नोव्हेंबर: बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात झालेल्या चकमकीत ३ महिलांसह ६ नक्षलवादी मारले गेले होते. यात मद्देड एरिया कमिटीचा इंचार्ज बुच्चन्ना आणि दुसऱ्या शीर्ष नक्षल लीडर पापारावची पत्नी उर्मिला यांचा समावेश होता.
१९ मे: याच वर्षी कुख्यात नक्षलवादी बसवाराजू हा अबूझमाडच्या कुडमेल-कलहाजा जाटलूर भागात झालेल्या चकमकीत मारला गेला. या एकाच कारवाईत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.





