वडूज (प्रतिनिधी) – समाजात सर्वच ठिकाणी देवीदेवतांची मंदिरे पहावयास मिळतात मात्र खटाव तालुक्यातील हिंगणे या गावात एका शेतकऱ्यांने चक्क छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले या मंदिरा आई तुळजाभवानी महाराजांना तलवार भेट देत असल्याच्या मूर्तीची शुक्रवारी प्रतिष्ठापना करण्यात आली. पांडुरंग रायते असे या शिवभक्त शेतकऱ्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शुक्रवार, 25 रोजी सकाळी सात वाजता हिंगणे गावातून भवानी माता व छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबर होमहवन व सत्यनारायण पूजा करण्यात आली.
दुपारी बारा वाजता मूर्तीची प्रतिष्ठापना करून पुष्पवृष्टी करण्यात आली. तद्नंतर दिवसभर महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिराच्या समोर भव्य मंडप उभारण्यात आला होता. यावेळी भगवान काळे, शिवाजी मोरे, दादासाहेब कुंभार, मोहन बर्गे, अशोक काळे, गोविंद ढोले, बाळासो पाटोळे, उत्तम निकम, पोपट काळे, जयप्रकाश जाधव, विजय काळे, संतोष निकम, वामन निकम, विलास पुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
विशेषतः पांडुरंग रायते या वयोवृद्धाने चक्क स्वतःची जमीन विकून व कर्ज काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे बांधकाम केले आहे. तर भवानी मातेने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार भेट देतानाची कलाकृती मंदिरात बसवण्यात आली आहे. पांडुरंग रायते यांनी केलेल्या या अनोख्या मंदिराचे सर्वत्र कौतुक होत आहेत. मंदिरात बसवणारी मूर्ती ही पंढरपूर येथे बनवण्यात आली आहे. आज हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.