“छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते, तर हिंदूंच्या रक्षणासाठी…” ; संभाजी भिडेंचा दावा

Sambhaji Bhide | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते, असे विधान केले आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश मिळाले नसल्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला आहे. मात्र काहीजण आपल्या सोयीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असल्याचा आरोपही संभाजी भिडे यांनी केला आहे.
सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मीय नव्हते. काही लोकांनी हे चिकटवले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदु धर्माच्या रक्षणासाठीच होते. शहाजी राजे हिंदवी राज्य स्थापन करायचे आहे असं बोलले आहेत. याचे पुस्तकात पुरावे आहेत. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. पण सगळ्या समाजातील लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्यासाठी कसा होईल ते बघतात,” असेही संभाजी भिडे म्हणाले.
वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुन काय म्हणाले संभाजी भिडे ?
रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरुन सध्या वाद सुरू आहेत. त्याबाबत संभाजी भिडे यांनी भाष्य केले आहे. “छत्रपती संभाजीराजे जे बोलत आहेत, ते 100 टक्के चूक आहे. वाघ्याची जी कथा सांगितली जाते, ती सत्य आहे. आज माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात, तेवढी त्याकाळी कुत्री होती. हे दाखवण्यासाठी रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा आवश्यक आहे. निदान आताच्या युगात देशाशी एकनिष्ठ राहणे गरजेचे आहे. त्याचे प्रतीक म्हणून वाघ्या कुत्र्याचा पुतळा रायगडावर राहिला पाहिजे. पण स्वार्थासाठी कशीही मतं बदलणाऱ्या माणसांना माझं मत पटणार नाही,” असे संभाजी भिडे यांनी म्हटले. Sambhaji Bhide |
काही दिवसांपूर्वीच मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हिंदवी स्वराज्याची लढाई इस्लामीकरणाच्या विरोधात झाली आणि छत्रपती शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता, असं विधान केले होते. ज्यानंतर त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. Sambhaji Bhide |
हेही वाचा:





