“छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर होते, त्यांच्या सैन्यात मुस्लिम…”; नितीन गडकरींचे विधान

Nitin Gadkari | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी भाषणादरम्यान गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेल्या लढाया, त्यांच्या काळातील राज्य कारभार याबाबत देखील माहिती दिली आहे.
विश्वास पाटील यांच्या ‘द वाइल्ड वॉरफ्रंट – शिवाजी महाराज: खंड २’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, “एक राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं ते उत्तमच होतं. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणं हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे १०० टक्के सेक्युलर राजे होते. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिक देखील होते.’
कधीही मशिदीवर हल्ला केला नाही
पुढे ते म्हणाले, ” छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले. कारण कल्याणच्या सुभेदाराची सून त्यांच्यासमोर आणली गेली तेव्हा ते म्हणाले की अशीच सुंदर आमची आई असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. तिला त्यांनी सन्मानाने घरी पाठवलं.”
आजकाल अनेक लोक आपल्या मुलांसाठी तिकिट मागतात
“वेळ आल्यानंतर आपल्या मुलालाही शिक्षा करताना त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही. आजच्या काळात ही शिकवण आवश्यक आहे. कारण आजकाल अनेक लोक आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तिकिट मागत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य हेच होतं की राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमुळे त्यांचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं,” असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
“शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. आमच्या आई आणि वडीलांपेक्षाही आमच्या मनात शिवाजी महाराज यांचं स्थान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम वडील देखील होते आणि उत्तम राजा देखील होते. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली. तेव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खान याने वार केला. तेव्हा शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध केला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी आदेश दिला की अफजल खानाची कबर सन्मानाने झाली पाहिजे,” असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले. Nitin Gadkari |
महाराष्ट्राबाहेरील लोकांमध्ये अनेक गैरसमज होते
मला या गोष्टीचा खूप आनंद होतो आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र इंग्रजी भाषेत येतं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, कार्य कर्तृत्व याबाबत महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांमध्ये अनेक गैरसमज होते. इंग्रजांच्या काळात जो इतिहास लिहिला गेला त्यात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अनेक अशा गोष्टी समोर आल्या होत्या ज्या चुकीच्या आणि गैरसमज पसरवणाऱ्या होत्या,” असेही यावेळी गडकरी यांनी सांगितले.
हेही वाचा:
राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा; वक्फ विधेयक मतदानाला ठाकरेंच्या एका खासदाराची दांडी





