छत्रपती संभाजीनगर : येथे हिट अँड रनची घटना घडली आहे. या घटनेत एका कार चालकाने दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पोबारा केला आहे. प्रस्तुत घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला असून, पायी जाणाऱ्या 3 मुली थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, हडको एन-13 भागात ही घटना घडली आहे. व्हिडिओत दिसून येत आहे की, एक फिक्कट निळ्या रंगाची ह्युंदाई कार भरधाव वेगात येते आणि प्रथम दुभाजकाला धडकून नंतर एका दुचाकीस्वाराला धडक देते. त्यानंतर हीच कार लगतच्या एका विजेच्या खांबालाही धडक देते. कारने दुचाकीला दिलेली धडक एवढी जोरात होती, दुचाकीस्वार अक्षरशः हवेत उडून खाली आदळतो, तर त्याची दुचाकी तशीच पुढे जोरात उडून जाते. ही घटना घडते तेव्हा दुचाकीस्वाराच्या विरुद्ध दिशेने 3 मुली येत होत्या. ही दुचाकी त्यांच्या अगदी जवळून पुढे जाते. ती त्यांना लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कारच्या धडकेमुळे महावितरणाचा खांब वाकला आहे. त्यामुळे या भागातील वीज पुरवठा दोन तास विस्कळीत झाला होता. या घटनेनंतर कार काहीक्षण जागीच उभी राहिली. पण नागरिकांनी तिच्या दिशेने धाव घेताच कार चालकाने घटनास्थळावरून वेगात पोबारा केला. त्यानंतर दुचाकीस्वार रस्त्यावर विव्हळताना दिसून आला. नागरिकांनी त्याला दिलासा दिला. हा सर्व थरार घटनास्थळालगतच्या एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्यात पायी जाणाऱ्या मुलीने भेदरलेल्या स्थितीत पळून जाताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतील. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर पोलिस कार व तिच्या मालकाचा शोध घेत आहेत.