छत्रपती संभाजीनगर : शहरात लावलेल्या एका बॅनरने खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत हे बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. या बॅनरवर 15 मिनिटांचे एकच उत्तर, 100 टक्के मतदान, असा मजकूर लिहिला आहे. अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात हे बॅनर लावण्यात आले आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप आणि एमआयएम यांच्यात चुरशीसी लढत पहायला मिळणार आहे. बॅनरवर 15 मिनिटांचे एकच उत्तर हा मजकूर हिरव्या रंगात छापले असून 100 टक्के मतदान केशरी रंगात छापण्यात आले आहे. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी 2012 मध्ये 15 मिनिटांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या सभेतही त्या विधानाचा दाखला देत पंधरा मिनिटांचा उल्लेख केला होता. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून हे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, हे बॅनर कुणी लावले याबाबत काहीही समजू शकले नाही. या बॅनरमुळे चर्चेला उधाण आले असून छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.