धनंजय मुंडेंच्या जागी मंत्रिपद मिळणार का? परदेशातून येताच छगन भुजबळ म्हणाले…

Chhagan Bhujbal : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंडेंऐवजी छगन भुजबळांना मंत्रीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. आता यावर भुजबळ यांनी भूमिका मांडली.
दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपदावरून काढून त्यांच्या जागी मला मंत्रिपद द्या, असे माझ्या मनात येणे अशक्य आहे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवरून सातत्याने विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. पवनचक्की प्रकल्पात खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला. त्याचाही या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप विरोधक करत आहे.
वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावरून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, विजय वडेट्टीवार किंवा जितेंद्र आव्हाड काय म्हणतात यावर मी काही चर्चा करू शकत नाही. हे डोक्यातून काढून टाका की, मला मंत्रिपद मिळालं नाही आणि मला मंत्रिपद मिळण्यासाठी कोणालातरी मंत्रिमंडळातून काढावं, असं काहीही माझ्या मनात येणं हे शक्य नाही.
छगन भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तसेच, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मला मंत्रिपदाबाबात काही बोलले नाहीत. फक्त 7 ते 10 दिवस थांबा, नंतर चर्चा करु एवढंच ते म्हणाले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.





