शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’च्या समावेशाला छगन भुजबळांचाही विरोध; म्हणाले – ‘आमच्या विचारधारेला….’

Chhagan bhujbal on manusmriti school syllabus – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यात विद्यार्थ्यांना मनाचे श्लोक व गीतेमधील अध्यायांचे पाठांतर करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे तीन श्लोक देखील शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
मनुस्मृती समता परिषदेच्या विचारांशी विसंगत आहे. आमच्या विचारधारेत ती बसत नाही. यामुळे शालेय अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्यास आमचा ठाम विरोध असेल, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
मनुस्मतीतील श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश यावर काही प्रतिक्रिया –
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया –
दीपक केसरकर म्हणाले, मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही. तो श्लोक अतिशय चांगला आहे. त्या ग्रंथातील अनेक भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. सर्वसाधारणपणे त्यातील काही ठराविक भागांवर आक्षेप असून आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आम्ही त्याचं समर्थन किंवा प्रचार करत नाही. मनुस्मृतीतील आक्षेपार्ह मजकुराचा आम्ही प्रचार करत नाही. मात्री ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्या श्लोकात एकही चूक नाही. त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात तो श्लोक शिकवला जातोय. सीबीएसई बोर्ड तो श्लोक शिकवत आहे.
माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया –
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न म्हणजे जुने बुरसटलेले विचार व वर्ण भेदाला पुरस्कृत करण्याचा प्रकार आहे. भाजपाला देशाच्या भवितव्याची चिंता नसून मनुवादी विचारांच्या ऱ्हासाची चिंता आहे म्हणूनच शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याचे घाटत आहे. राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा (SCERT) ने जाहीर केला आहे. यात मनुस्मृतीचा समावेश आहे. हा प्रकार मनुची विभाजनकारी मूल्ये विद्यार्थ्यांच्या निरागस मनावर लादण्याच्या डाव असून काँग्रेसचा याला तीव्र विरोध आहे. अभ्यासक्रम आराखड्यातून हा आक्षेपार्ह भाग काढवा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा माजी शालेय शिक्षण मंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ?
सत्ताधारी मागच्या दाराने त्यांच्या मनातील गोष्ट पूर्ण करु पाहत आहेत. आमच संविधान म्हणजेच मनुस्मृती, असं म्हणणारे जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय घडतं, त्याचं उदाहरण म्हणजे पाठ्यपुस्तकांचा यादीत पुस्तकात मनुस्मृतीचा समावेश होत आहे. ज्या मनुस्मृतीने भारताच्या वाटोळं केलं, समाजात दुही माजवली आहे, समाजामध्ये चातुवर्ण्याचा समावेश केला, जातीभेद निर्माण केला, स्त्रियांना तर सर्वात घाणेरडी वागणूक घेण्याची पद्धती या मनुस्मृतीने जन्मला घातली, ती मनुस्मृती परत आणली जात आहे.
जे लोक 1950 साली म्हणाले की, आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृती दहन केलं आणि 1950 मध्ये संविधान जन्माला घातलं त्यासाठी आपण महाडला जात आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीच दहन करतोय, संविधानासाठी दो बलिदान, असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांची प्रतिक्रिया –
राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि मनाचे श्लोक समाविष्ट करण्याचा विचार सुरु आहे, ही गोष्ट माझ्या कानावर आली. यावरुन राज्य सरकारची संविधानाच्या बाबतीत काय मानसिकता आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सामजिक संस्थांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मुलांच्या डोक्यात नेमकं काय घालण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे कळत नाही. याबाबत प्रागतिक विचाराचे जे कोणी लोक आहेत, त्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले.
रामदास आठवले काय म्हणाले –
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. जातीभेद विषमता आणि माणुसकीला काळिमा फासणाऱ्या भेदभावाच्या अनेक बाबी मनुस्मृतिमध्ये आहेत. त्यामुळे मानवतेच्या हक्कासाठी; विषमता आणि जातीभेदाच्या अमानुष रूढी परंपरे विरुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून सामाजिक क्रांती केली. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलेल्या मनुस्मृतीचे श्लोक अभ्यासक्रमात घेण्यास आंबेडकरी जनतेचा तीव्र विरोध आहे. रामदास आठवलेंनी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
मनुस्मृतीच्या श्लोकांचा अभ्याक्रमात समावेश केला जाणार नाही – केसरकर
दरम्यान, शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. याबाबत रामदास आठवले यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी दीपक केसरकर यांनी शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक येणार नसल्याचे ठोस आश्वासन रामदास आठवले यांना दिले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे श्लोक घेण्याच्या विषयाला पूर्णविराम मिळाला आहे.





