Purandar : परिंचे येथील नाथ डोंगरावर रंगला छबिना
Purandar : बारा बलुतेदार, मानकरी नऊ दिवस देवाच्या सेवेसाठी मंदिरात हजर राहतात. सातव्या माळेचे औचित्य साधून दिगंबर गुरव व राहुल गुरव यांनी डोंगरावरील उत्सवमूर्तींना अभिषेक करून विधिवत पूजा केली.

परिंचे : नवरात्रोत्सवानिमित्त सातव्या माळेचे औचित्य साधून परिंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात सकाळी महाआरती करण्यात आली. नाथांच्या उत्सवमूर्तींना पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात निशान, छत्री, अब्दागिरी, वस्त्र परिधान केलेली दुधाळवाडी येथील मानाची काठी या सर्व लवाजम्यासह भाविक मोठ्या संख्येने डोंगरावरील मुख्य काळभैरवनाथ मूर्तीच्या दर्शनासाठी गेले होते. ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत डोंगरावर भाविक भक्तांचा छबिण्याचा सोहळा रंगला होता. बळीराजाला दुष्काळी संकटाला दोन हात करण्याचे बळ देण्यासाठी देवाकडे साकडे घालण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले.
ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात घटस्थापनेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. उपासकरी तसेच भाविकांच्या शंभर समई प्रज्वलित करून दहा दिवस तेवत ठेवल्या जातात. दोन प्रहरात प्रदक्षिणा महाआरती होते. शंभरहून अधिक भाविक उपासनेसाठी मंदिरात बसले आहेत. बारा बलुतेदार, मानकरी नऊ दिवस देवाच्या सेवेसाठी मंदिरात हजर राहतात. सातव्या माळेचे औचित्य साधून दिगंबर गुरव व राहुल गुरव यांनी डोंगरावरील उत्सवमूर्तींना अभिषेक करून विधिवत पूजा केली.
ग्रामप्रदक्षिणेसह पालखी विसावली
गावातील दुधाळ, वाघोले, नवले, घारमळकर यांचे मानाचे ढोल छबिण्यात उतरले होते. छबिण्यासह पालखीची प्रदक्षिणा होऊन दुपारी बारा वाजता, बारा सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत दादा गोंधळी, चैतन्य जंगम, लोकेश कुंभार, बाळासाहेब जाधव, माणिक वाघोले यांनी देवाची महाआरती केली. यावेळी भाविकांनी कडाकण्यांचा नैवेद्य दाखवला, दुपारी साडेबारा वाजता पालखी डोंगर उतरून खाली आली. गावातील प्रत्येक देवळात आरती करून पालखीने ग्राम प्रदक्षिणा पूर्ण केली आणि दुपारी दीड वाजता पालखी मंदिरातील सभामंडपात विसावली.





