Chhaava | Jalna News : सध्या देशभरात ‘छावा’ चित्रपटाची प्रचंड क्रेझ आहे. छावा चित्रपटाला रिलीज होऊन आता एक आठवडा पूर्ण झाला आहे. चित्रपटाने बॅाक्स अॅाफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लवकरच छावा 500 कोटींची सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समाविष्ठ होईल. या चित्रपटाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भरभरून कौतुक केले. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्की कौशलचं सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वत्र छावा माहोल तयार झाला असून प्रेक्षकांची पाऊल थिएटर्सकडे वळताना दिसत आहेत. दरम्यान, आश्यताच एक अजब प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला आहे. जालना जिल्ह्यात छावा चित्रपट पाहायला आलेल्या मद्यधुंद लोकांनी चक्क सिनेमागृहात तोडफोड केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहरात एका सिनेमागृहात काही मद्यधुंत प्रेक्षक घुसले. त्यांना छावा हा चित्रपट विनामूल्य पाहायचा होता. मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांनी सिनेमागृहात घुसून थेट तोडफोड चालू केली. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 23 फेब्रुवारीच्या रात्री ही घटना घडल्याचं म्हटलं जातंय. रात्री साधारण साडे दहा वाजता मद्यधुंद लोकांनी सिनेमागृहात धुडगूस घालून तोडफोड केली. तोडफोड झालेल्या चित्रपटगृहाचे नाव ‘नीलम’ असे आहे. याच चित्रपटगृहात छावा हा चित्रपट दाखवला जात होता. मात्र आम्हाला हा चित्रपट मोफत पाहायचा आहे, असे म्हणत या आरोपींनी सिनेमागृहात आरेरावी चालू केली. त्यानंतर थेट तोडफोड चालू केली. यावेळी त्यांनी सिनेमागृहाच्या काचा फोडल्या. दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर सिनेमागृहाद्वारे पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल करून घेतला आहे. यामध्ये एक ज्ञात आरोपी असून एकूण सात जणांवर जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विक्की कौशलसोबतच अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.