पुणे – रणवीर मोहिते याने एक दिवसीय खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्याने सात फेऱ्यांमध्ये अपराजित्व राखताना साडेसहा गुणांची कमाई केली. ही स्पर्धा व्हिक्टोरियस अकादमीने आयोजित केली होती.
चुरशीने झालेल्या या स्पर्धेत सोहन फडके याला उपविजेतेपद मिळाले.
त्याने 6 गुण नोंदविले.कपिल लोहाना याने तिसरे स्थान घेताना साडेपाच गुण मिळविले. केवल निर्गुण, अभय कर्नाटकी, राहुल संगवईकर व सिद्धांत गायकवाड यांचे प्रत्येकी पाच गुण झाले. प्रगत गुणांच्या आधारे त्यांना अनुक्रमे 4 ते 7 क्रमांक देण्यात आले. गौरव बाकलीवाल, ओम लामकाने व नमीत चव्हाण हे अनुक्रमे 8 ते 10 क्रमांकाचे मानकरी ठरले. धैवत आपटे, ओंकार देशपांडे, जयवंत देशपांडे, मयूर मोघे व चक्षु गोयल यांनी 1201 ते 1400 मानांकन गुणाच्या विभागात अनुक्रमे पहिले पाच क्रमांक घेतले. 1200 पेक्षा कमी मानांकन गुणांच्या विभागात आदिती कयाळने प्रथम पारितोषिक मिळविले.
बिगरमानांकित खेळाडूंच्या गटात अनिल शर्मा याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेतले. अन्य विभागात अर्जुन चांदसकर (8 वर्षाखालील), मानस रांगे (10 वर्षाखालील), साईराज गायकवाड (12 वर्षाखालील) हे विजेते ठरले. सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचे बक्षीस दिशा ढोरे हिला देण्यात आले. प्रकाश करमरकर यांना सर्वोत्कृष्ट ज्येष्ठ खेळाडूचे पारितोषिक मिळाले. अक्षज चारी याला विशेष नैपुण्याबद्दल गौरविण्यात आले.