लिव्ह, (युक्रेन) – चेर्नोबिल अणूभट्टीला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे रशियाच्या फौजांकडून नुकसान झाले आहे, असे युक्रेनच्या सरकारी वीज पुरवठा कंपनीने म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच चेर्नोबिल अणूभट्टीचे रशियाच्या फौजांकडून नुकसान झाले होते. त्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या अणूभट्टीचे नुकसान झाले आहे, असे युक्रेनारगो या वीज पुरवठा करणाऱ्या सरकारी कंपनीने म्हटले आहे.
कंपनीच्या तंत्रज्ञांनी रविवारी संध्याकाळी चेर्नोबिलचा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत सुरू केला होता. मात्र वीज पुरवठा पूर्णपणे सुरू केल्या जाण्यापूर्वीच रशियाच्या फौजांनी हा वीजपुरवठा पुन्हा एकदा खंडीत केला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आता हा वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
चेर्नोबिल अणूभट्टीमधून किरणोत्सर्ग रोखण्यासाठी आण्विक इंधन भरण्यासाठी जे पंप वापले जातात, त्यांचाच वीज पुरवठा कंडीत झाला आहे. चेर्नोबिल अणूभट्टीमध्ये डिझेल जनरेटरचाही वापर केला जातो आहे. चेर्नोबिलमधून किरणोत्सर्ग होऊ नये यासाठी जवळच्या सीमेवरून तेथे आपत्कालिन वीजपुरवठाही सुरू केला असल्याचे बेलारुसच्या प्रशासनानेही म्हटले आहे.
चेर्नोबिलमधील आण्विक कचऱ्याच्या सुरक्षेच्या मुद्यावरून आंतरराष्ट्रीय अणू उर्जा एजन्सीनेही संभाव्य धोके नाकारले आहेत. जरी वीज पुरवठा खंडीत झाला तरी चेर्नोबिलमधील आण्विक इंधनाच्या टाक्या सुरक्षित ठेवल्या जाऊ शकतील, असे “आयएइए’ने म्हटले आहे.