Nagar | एमआयडीसीतील केमिकलयुक्त पाणी रस्त्यावर

नगर, (प्रतिनिधी) – निंबळक-नागापूर रस्त्यावर गॅस कंपनीसमोर असणाऱ्या कारखान्यामधून रसायनयुक्त घाण पाणी गटारीमध्ये मोटारीच्या साहाय्याने सोडले जात आहे. हे पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना याच पाण्यातून जाण्याची वेळ आली आहे. यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
प्रदूषण मंडळही या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. या पाण्याबाबत कार्यवाही झाली नाही, तर एमआयडीसी, प्रदूषण मंडळाच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा पंचायत समिती माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, बी. डी. कोतकर यांच्यासह नागरिकांनी दिला आहे.
निंबळक-नागापूर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात चोवीस तास वाहतूक सुरू असते. या रस्त्यावर असणाऱ्या गॅस कंपनीसमोर कारखाने, कंपनीमध्ये वापरात असणारे केमिकलयुक्त पाणी रात्रीच्या वेळी मोटारीच्या साहाय्याने गटारीत सोडले जाते.
तेच पाणी रस्त्यावर येते. याचा प्रचंड उग्र वास येतो. या कारखान्याजवळच लोकवस्ती आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत एमआयडीसी, प्रदूषण विभागाने दखल घेतली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.





