Shirur : घोड नदीत थेट रसायनमिश्रित पाणी
Shirur : नगराध्यक्ष पाचर्णे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांना निवेदन दिले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील एमइपीएल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित सांडपाणी नाल्याद्वारे थेट घोड नदीत सोडले जात असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.

शिरूर : रांजणगाव एमआयडीसीतील एमईपीएल कंपनीकडून रसायनमिश्रित सांडपाणी थेट घोड नदीत सोडले जात असल्याचा गंभीर आरोप शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी केला आहे. शिरूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा स्रोत असलेल्या घोड नदीच्या पाण्यातच दूषित पाणी मिसळत असेल, तर हजारो नागरिकांच्या आरोग्याचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पाचर्णे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके यांना निवेदन दिले आहे. रांजणगाव एमआयडीसीतील एमइपीएल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया न केलेले रसायनमिश्रित सांडपाणी नाल्याद्वारे थेट घोड नदीत सोडले जात असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
घोड नदीतील पाणी शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरले जाते. त्यामुळे नदीत रसायनमिश्रित सांडपाणी मिसळत असल्यास त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. औद्योगिक सांडपाण्याच्या विल्हेवाटीत नियमांचे उल्लंघन होत असल्यास ते खपवून घेता कामा नये.
प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रिस्त?
औद्योगिक क्षेत्रातील सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया होते की नाही, त्याची विल्हेवाट नियमानुसार होते की नाही, यावर संबंधित यंत्रणांनी नियमित देखरेख ठेवणे अपेक्षित आहे. नदीत रसायनमिश्रित पाणी सोडल्याचा आरोप पुढे येत असेल, तर प्रदूषण नियंत्रण यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, सांडपाणी सोडले जात असल्याच्या ठिकाणचे तसेच घोड नदीतील पाण्याचे नमुने घ्यावेत, त्यांची मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. तपासणीत नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित कंपनीवर कारवाई करणे गरजेचे आहे.





