संगमनेर – तीन महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून ओळख झालेल्या तरुणाने मामाच्या गावी 19 वर्षीय तरुणीला बळजबरीने पळवून नेत दोन दिवस अत्याचार केला. या घटनेनंतर तिसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेला आळंदीत नेवून तिच्याशी लग्नही केले. मात्र, मुलगी सासरी आल्यानंतर त्या तरुणाचे आधीच लग्न झाल्याचे ऐकून तिला धक्काच बसला आणि अखेर याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार आणि धमकावल्यावरुन आरोपी केशव बबन काळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित तरुणी सुट्टीत एप्रिल 2023 रोजी कुरकुंडी परिसरात मामाच्या घरी आली होती. तेथे इंन्स्टाग्रामवर आरोपी केशव काळे या तरुणाशी ओळख होते. इंन्स्टाग्रामवरून मोबाईल नंबर एकमेकांना मिळाला. त्यानंतर तिला दम देत, तू माझी झाली नाही तर तू कोणाची होणार नाही, अशी धमकी दिली. पीडित तरुणी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी पिंपळगाव देपा चौकातील परिसरात आरोपी केशव काळे हा मोटारसायकलवर आला. तू माझ्याबरोबर चल, अशी धमकी देत गाडीवर बसवून जुन्नर तालुक्यात आरोपी केशव काळे याच्या मामाच्या घरी नेले. तेथे दोन दिवस मुक्काम केला. तेथे बळजबरीने पीडिीत तरुणीवर अत्याचार केला.
यानंतर केशव काळे हा आळंदी येथे तिला घेऊन गेला. यावेळी त्याच्या सोबत आई-वडील व नातेवाईक देखील होते. एका संस्थेत लग्न केले. तेथून पुन्हा आरोपी केशव काळे याच्या मामाच्या घरी गेले असता तेथे पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोपीने पीडितेसह आपले मूळगाव गाठले. केशव काळे याचे दीड वर्षांपूर्वी लग्न झालेले असल्याची माहिती पीडितेला समजली. त्यानंतर पीडितेचे आई-वडील व भाऊ तेथे आले. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घेत पुन्हा गाव गाठले. या सर्व घडामोडींमुळे मानसिक स्वास्थ ढासळलेल्या पीडितेने मंगळवारी घारगाव पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली.
आरोपी केशव बबन काळे (वय 23, रा. कुरकुंडी) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे व तो सध्या मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात जुन्नर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाली. येत्या शुक्रवारी (ता.28) त्याच्या कोठडीची मुदत संपणार असून, त्यानंतर त्याला घारगाव पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.