ChatGPT: ओपनएआय ने वापरकर्त्यांसाठी एक नवीन आणि उपयुक्त फाइनान्स फीचर सादर केलं आहे. या फीचरमुळे आता वापरकर्ते आपले बँक अकाउंट, क्रेडिट कार्ड आणि गुंतवणुकीची माहिती थेट ChatGPT सोबत जोडू शकतात. त्यामुळे खर्चाचा हिशेब ठेवणं, सबस्क्रिप्शन तपासणं आणि आर्थिक नियोजन करणं अधिक सोपं होणार आहे. अनेकांना दर महिन्याला खर्च किती झाला, क्रेडिट कार्ड बिल किती आलं किंवा गुंतवणुकीत काय बदल झाले हे समजून घेणं अवघड जातं. याच समस्येवर उपाय म्हणून हे नवीन फीचर आणण्यात आलं आहे. अकाउंट जोडल्यावर एआय तुमच्या व्यवहारांचं विश्लेषण करून सविस्तर माहिती देतं. या फीचरमुळे वापरकर्ते थेट प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ, “या महिन्यात माझा एकूण खर्च किती झाला?”, “कोणती सबस्क्रिप्शन अजून सुरू आहेत?”, “माझा खर्च आधीपेक्षा वाढलाय का?” किंवा “सध्या घर खरेदी करणं शक्य आहे का?” अशा अनेक प्रश्नांची उत्तरं काही सेकंदांत मिळू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवस्थापन अधिक स्मार्ट आणि सोपं होणार आहे. या सेवेसाठी ओपनएआयने प्लेड इंटिग्रेशनचा वापर केला आहे. त्याद्वारे १२ हजारांहून अधिक बँका आणि आर्थिक संस्थांना सपोर्ट मिळतो. यामध्ये चेस, फिडेलिटी, रॉबिनहुड, श्वाब, अमेरिकन एक्सप्रेस आणि कॅपिटल वन यांसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. हे फीचर GPT-5.5 Thinking मॉडेलवर आधारित असून Pro वापरकर्त्यांना GPT-5.5 Pro मॉडेलचाही वापर करता येणार आहे. ChatGPT हे फीचर वापरण्याची पद्धतही सोपी आहे. सर्वप्रथम ChatGPT अॅप किंवा वेबसाइट उघडावी लागेल. त्यानंतर साइडबारमध्ये दिसणाऱ्या फाइनान्स सेक्शनवर क्लिक करावं. हा पर्याय दिसत नसेल तर चॅट बॉक्समध्ये “@Finances, connect my accounts” असं टाइप करावं. त्यानंतर प्लेडच्या सुरक्षित प्रक्रियेद्वारे बँक किंवा गुंतवणूक खाते लिंक करता येईल. खाते जोडल्यावर वापरकर्ता थेट एआयला आर्थिक प्रश्न विचारू शकतो. सुरक्षेबाबतही कंपनीने विशेष काळजी घेतल्याचा दावा केला आहे. ChatGPT फक्त अकाउंट बॅलन्स, व्यवहार, गुंतवणूक आणि कर्जाची माहिती पाहू शकतो. मात्र तो कोणतेही पैसे ट्रान्सफर करू शकत नाही. तसेच पूर्ण अकाउंट नंबरही त्याला दिसत नाही. वापरकर्त्यांना हवं असल्यास ते कधीही अकाउंट डिस्कनेक्ट करू शकतात. डिस्कनेक्ट केल्यानंतर ३० दिवसांच्या आत संबंधित डेटा सिस्टिममधून हटवला जातो. आर्थिक माहिती हटवण्याचं नियंत्रणही वापरकर्त्यांकडेच असणार आहे. विशेष म्हणजे Temporary Chat वापरत असताना एआयला आर्थिक माहितीचा प्रवेश मिळणार नाही. भविष्यात या फीचरमध्ये आणखी काही सुविधा येण्याची शक्यता आहे. यामध्ये टॅक्स अंदाज, स्टॉक सेल कॅल्क्युलेशन, बजेट प्लॅनिंग आणि क्रेडिट अप्रूवल इनसाइट्ससारख्या सुविधांचा समावेश असू शकतो. त्यामुळे भविष्यात ChatGPT एक स्मार्ट एआय फाइनान्शियल असिस्टंट म्हणून काम करू शकतो.