पिंपरी | चार्जिंग स्टेशन कागदावर, इलेक्ट्रिक वाहनांना अपेक्षित मागणी नाही

पिंपरी, (प्रतिनिधी) – सध्या वातावरणातील बदलामुळे विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रदूषण आणि पारंपारिक इंधनावरील निर्भरता कमी करण्यासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण अवलंबले. शासनाने सबसिडी देऊन इलेक्ट्रिक वाहनांची किंमत इतर वाहनांच्या तुलनेत खूप अधिक असल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीचा वेग मंदावला.
त्यातच पुरेशी चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध नसल्याने अनेकांनी पेट्रोल आणि सीएनजीच्या वाहनांनाच प्राधान्य दिले. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढविण्यासाठी शहरात २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन बनविण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु हे चार्जिंग स्टेशन कागदावरच राहिले आहेत.
पिपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडील उपलब्ध माहितीनुसार २०२१ पासून आतापर्यंत शहरात ४ लाख ९५ हजार वाहनांची नोंदणी झाली आहे त्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या केवळ ४६ हजार इतकी आहे. अर्थात एकूण वाहनांच्या दहा टक्केही इलेक्ट्रिक वाहने नाहीत.
विजेवरील वाहनांचा वापर वाढावा यासाठी महापालिकेने शहरात २२ विविध विकाणी खासगी संस्थेद्वारे चार्जिग स्थानके उभारण्यासाठी जागा निश्चित केल्या आहेत. बांधा आणि स्वयंचलित करा या तत्वावर ही स्थानके उभारली जाणार आहेत. सुमारे दोन वर्षांपासून स्थानकांची जागा निश्चित करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात तेथे अद्याप कामास सुरवात झालेली नाही.
महावितरणकडून वीज पुरवठा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून आठ वर्षांकरिता स्वतःच्या खर्चाने वीजपुरवठा घेणे, चार्जिंग स्थानक उभारणे आणि देखभाल करणे या बाबी संबंधित संस्थेने करणे आवश्यक आहे. मात्र, दोन वर्ष महापालिकेचा विद्युत विभागाने काढलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अटी-शर्तींमध्ये बदल करून निविदा प्रसिद्ध केली असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.
चार्जिंग स्टेशनच्या जागा
महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचे प्रांगण, पिंपरीतील सिट्रस हॉटेलजवळ, दुर्गादेवी टेकडी, वाहतूकनगरी – निगडी, मेजर ध्यानंचद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, कोकणे चौक पिपळे सौदागर, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय – चिखली, बर्ड व्हॅली संभाजीनगर,
कुस्ती संकुल भोसरी, मलनिःस्सारण केंद्र – चिखली, लांडेवाडी – भोसरी, भक्ती – शक्ती निगडी, बजाज ऑटोजवळ, संत तुकारामनगर मेट्रो स्थानक, पी. के. चौक, योगा पार्क पिंपळे सौदागर, राजमाता जिजामाता उद्यान-पिंपळे गुरव, संतनगर उद्यान – कासारवाडी, बी. डी. किल्लेदार उद्यान – वल्लभनगर, ऑटो क्लस्टर – चिंचवडस्टेशन आणि राजर्षी शाहू उद्यान.
वाहन खरेदी घटली
वाढते इंधनाचे दर यामुळे गेल्या तीन वर्षांत इलेक्ट्रीक वाहनांना मोठी पसंती मिळत होती. किंमत जास्त असली तरी, त्यावर शासनाची सबसिडी मिळत होती. मात्र, आता चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने व वाढत्या किमतीमुळे इलेक्ट्रीक वाहनांची खरेदी कमी होताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या गुढीपाडव्याला पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे शंभरच्या आत हा आकडा आहे.





