Santosh Deshmukh Murder Charge Sheet : संतोष देशमुख हत्या प्रकरणी 83 व्या दिवशी चार्जशीट दाखल ! सुरेश धस म्हणाले…

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी 83 व्या दिवशी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींवर दीड हजार पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली तसेच तपासी अधिकारी अनिल गुजर, किरण पाटील यांनी आज दुपारी 4 च्या सुमारास बीड न्यायालयात हे दोषारोपपत्र दाखल केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी आणि हत्येच्या आरोपाखाली वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मकोका देखील लावण्यात आला आहे. दीड ते पावणे दोन महिन्यांपासून सगळे आरोपी तुरुंगात आहेत.
आ. सुरेश धस यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया
देशमुख यांच्या हत्येच्या 83 व्या दिवशी गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख बसवराज तेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 8 आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. यावर बोलताना भाजप आमदार सुरेश धस यांनी गृहमंत्री फडणवीस यांना धन्यवाद दिले. मकोका, हत्या, खंडणी, ॲट्रोसिटी अशा सर्व प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेली आहेत. गुन्हेगारांवर जर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल झाले नाही तर संबंधित आरोपी जामिनास पात्र ठरतो. पण बीड प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगारांना जामिनाचा पर्यायही ठेवला नाही अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.





