Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल प्रकरणात 5 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल; पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार
Ketan Agrawal Case : पोलिसांकडून डिजिटल, तांत्रिक, वैद्यकीय तसेच इतर महत्त्वाचे पुरावे संकलित

लोणावळा – लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात तब्बल ५,०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल, तांत्रिक, वैद्यकीय तसेच इतर महत्त्वाचे पुरावे संकलित केले आहेत.
तपासादरम्यान केतन अग्रवाल, त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटिंग तसेच मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) महत्त्वाचे पुरावे ठरले आहेत. त्याचबरोबर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अहवाल, घटनास्थळावरून जप्त केलेल्या वस्तू, डिजिटल व सायबर पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब यांचा दोषारोपपत्रात समावेश करण्यात आला आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, केतन अग्रवाल याची भावी पत्नी सिया गोयल हिने सहआरोपीच्या मदतीने त्याला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या अनुषंगाने तपासात संकलित करण्यात आलेले पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आहेत. मात्र, आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपींना दोषी मानता येणार नाही. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर प्रकरणातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे.
न्यायालयाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची व पुराव्यांची छाननी केली जाईल. त्यानंतर कायद्यानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. दरम्यान, आरोपीचे वकील ॲड. राम सहाणे यांनी दोषारोपपत्र दाखल झाल्याला दुजोरा दिला. कागदपत्रांचा अभ्यास करून न्यायालयात आरोपीची बाजू मांडली जाईल, असे त्यांनी सांगितले.
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवाचा सांस्कृतिक वारसा आता डिजिटल स्वरूपात





