रेडा – राज्याची शिखर बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील कथित 25 हजार कोटी रुपयांच्या कर्जवितरण घोटाळ्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 56 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यात भाजपचेही अनेक नेते आहेत. पण, फक्त अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीची यादी जाहीर करण्यात आली. पण, हे आरोप सिद्ध होणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. इंदापूर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी अजित पवार यांची पाठराखण केली. ते म्हणाले की, राज्याच्या उभारणीत राज्य सहकारी बॅंकांचे मोठे योगदान आहे; त्यामुळेच उद्योगधंद्यांना कर्ज देण्यात आले. यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकली. परंतु, जनहितासाठी घेतलेले निर्णय आज कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात असला तरी वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शरद पवार यांच्यावर झाला. परंतु, तो सिद्ध झाला नाही. आता, अजित पवार यांच्यावर आरोप होत आहेत. परंतु, हे ही सिद्ध होणार नाहीत. केवळ, पवार यांच्यावर आरोप केले की प्रसारमाध्यमात चर्चा होते, यातून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी सांगितले.