Chardham Yatra 2024: चारधाम यात्रेकरुंसाठी पूर्व नोंदणी आवश्यक; 31 मे पर्यत व्हिआयपी दर्शनावर बंदी

Chardham Yatra 2024 – चारधामला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणावर वाढ झाली असून अभूतपूर्व गर्दी निर्माण झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर ताण पडला असून याचा त्रास भाविकांना होत असल्याचे स्थानिक प्रशासनाला आढळून आले आहे. भाविकांना या गर्दीचा त्रास होऊ नये तसेच त्यांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी ३१ मे, २०२४ पर्यत उत्तराखंड प्रशासनाने व्ही.आय.पी. दर्शन बंद केले आहे.
भाविकांची संख्या वाढतच असल्याच्या पार्श्वभूमीवर चारधाम येथील भाविकांच्या दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी आणि त्यांना कोणत्याही गैरसोयीचा सामना करावा लागू नये तसेच त्यांचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी उत्तराखंड शासनाने धाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरु केली असून दर्शनासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे. भाविकांनी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर पूर्व नोंदणी करावी. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली आहे त्या तारखेलाच भक्तांना चारधाम दर्शनाची परवानगी असेल याची भाविकांनी नोंद घ्यावी.
वृद्ध आणि आजारी असलेल्या भाविकांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. यासंदर्भात उत्तराखंड शासनाच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्या https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यात्रेकरुंनी या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन राधा रतूडी, मुख्य सचिव, उत्तराखंड शासन, डेहराडून यांनी केले आहे.


