प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीत एकूण १६५ जागांपैकी दोन जण बिनविरोध झाले. असे असताना महाविकास आघाडीने तब्बल २१० जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांना एबी फाॅर्मही दिले आहेत. त्यामुळे तब्बल ४५ जागांवर मित्रपक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही सगळी आकडेवारी पाहता कोणत्या प्रभागात कोणी कोणी क्राॅस उमेदवार दिले आहेत, याची तपासणी पक्षातर्फे अजूनही केली जात असून, अर्ज मागे घेण्याची मुदतही संपली आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हे तिघे आहेत. त्यात काँग्रेसने ९८ जागांवर उमेदवार दिले होते. त्यातील बिबवेवाडी आणि सिंहगड येथील प्रत्येकी अशा दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे त्यांचे ९६ उमेदवार रिंगणात आहेत. मनसेने ४४ जणांना एबी फाॅर्म दिले, तर ठाकरेंच्या शिवसेनेने तब्बल ७८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. या तिघांची बेरीज केली, तर ती २१० जागांची होते. त्यामुळे उमेदवारीचे वाटप करताना काँग्रेस- शिवसेना आणि मनसे यांच्यातील समन्वय बिघडला आहे. ४१ पैकी जवळपास ९ प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असून, आठ प्रभागांत काँग्रेस, तर चार प्रभागांत शिवसेनेचे आणि दोन प्रभागात मनसेचे चारही उमेदवारांचे चिन्ह एकच असणार आहे. ४१ पैकी ७ प्रभागांत १५ जागांवर आघाडीतील मित्रपक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आघाडीचा धर्म पाळत मनसेला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने आपल्या वाट्याच्या जागांतील काही मनसेला देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रत्यक्षात तिन्ही पक्षांकडून वाटणीपेक्षा जादा एबी फॉर्मचे वाटप केले. त्यामुळे आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून आले. त्यानुसार नऊ प्रभागात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि मनसेचे उमेदवार रिंगणात आल्याने तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. येथे होणार मैत्रीपूर्ण लढती फुलेनगर-नागपूर चाळ (प्रभाग २) येथे प्रभाग ब वर्गात काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांचे उमेदवार एकमेकांसमोर आहेत, तर खराडी- वाघोली (प्रभाग ४) येथे ‘क’ गटात, कल्याणीनगर वडगाशेरी (प्रभाग ५) मध्ये ‘ब’ काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत. येरवडा- गांधीनगर (प्रभाग ६) मधील चारपैकी तिन्ही गटात काँग्रेस-शिवसेनेनेही उमेदवारी देऊ केल्याने तेथे मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. कोंढवा खुर्द-कौसरबाग (प्रभाग १९) येथे काँग्रेसने चारही उमेदवार रिंगणात उतरविले आहेत; परंतु त्याच प्रभागात आघाडीतील मित्रपक्ष असलेली शिवसेना-मनसे यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना संधी दिल्याने भाजप-शिंदे शिवसेनेबरोबरच आघाडीतील मित्रपक्षांशी काँग्रेसला लढत द्यावी लागणार आहे. ही परिस्थिती घोरपडेपेठ-समताभूमी (प्रभाग २६) मध्ये एकमेकांसमोर आल्याने मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत.