युवा सेनेचा आरोप : चौकशीची मागणी पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अनागोंदी कारभार सुरू आहे. बॅच, बिल्ला आदींच्या वितरणात गोंधळ असून, याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडे युवासेनेने निवेदन दिले आहे. गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करुन निलंबित करण्यात यावे. माहिती अधिकार कायद्यानुसार याबाबत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, बॅच बिल्ला, वाहन परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन चाचणी घेणारे वाहन निरीक्षक इत्यादी विषयी माहिती प्राप्त झाली. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवासी दाखले, ज्या दिवशी संबंधित अधिकारी रजेवर आहेत, त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले असल्याचे या माहितीतून उघड झाले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडीओ चित्रीकरण करणे बंधनकारक असताना त्याचे रेकॉर्ड उपलब्ध नसल्याचेही दिसून आले आहे. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी युवासेनेच्या पिंपरी विधानसभेच्या युवती सेनाधिकारी प्रतीक्षा घुले, विभाग संघटक नीलेश हाके, ऍड. अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड यांनी केली आहे.