पंतसचिव राजवाड्यात रामनामाचा जयघोष..; फुलांची उधळण करत रामजन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

भोर : आज देशभरात प्रभू श्री राम यांचे जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. जयंती सोहळ्याची जय्यत तयार करण्यात येत असून शोभा यात्रा काढण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील भोर येथील प्राचीन राजवाड्यात प्रभू श्री राम यांचा जन्मोत्सव सोहळ्या मोठ्या जल्लोषात पार पडला. दुपारी १२ वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते हा जन्मसोहळा पार पडला. यापूर्वी सकाळी ११ वाजता भव्य शोभायात्रा देखील शहरात काढण्यात आली. या शोभा यात्रेत रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शोभा यात्रेत प्रभू श्री राम यांचा जयघोष करण्यात आला.
पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या आलोट गर्दीत रामजन्म सोहळा म्हणजेच रामनवमीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी 11 च्या दरम्यान प्रभू श्री रामा यांच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला.
यावेळी रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. हे दृश्य हेचि देही हेची डोळा अशाच स्वरुपाचे होते. संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि महिलांनी नववारी साड्या परिधान केल्या होत्या. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रामजन्म सोहळ्यात दंग झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता.
चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतिंच्या हस्ते श्री रामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरूवात होते. या राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तर त्यापैकी सध्या ऐतिहासिक असलेल्या राजवड्यात 150 वर्ष हा सोहळा साजरा केला जातो.





