मावळ : थर्टीफर्स्टच्या पूर्वसंध्येला आलेला विकेंड या सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अवजड आणि जड वाहनांनी शनिवार, रविवार व मंगळवार या तीनही दिवशी दुपारी बारानंतर घाटातून प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. दरवर्षी लोणावळ्यात थर्टी फर्स्टला मोठी गर्दी होत असते. सलग सुट्टयांमुळे घाटांमधील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी अवजड वाहनांना घाट सुरू होण्यापूर्वी थांबविण्यात येते. यावर्षी अवजड आणि जड वाहनांनी घाटामधून दुपारी बारानंतर प्रवास करावा, असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात घाटामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, चालकांचा वेळ वाचेल. तसेच लोणावळा ग्रामीण पोलिसांनीही पवना धरण परिसरात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात बदल करून त्या त्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.