औषधी कंपन्यांच्या सीएसआर नियमांमध्ये बदल

नवी दिल्ली – शेअर बाजारावर नोंदलेल्या कंपन्यांना (सामाजिक दायित्व उपक्रम) सीएसआरअंतर्गत एकूण नफ्याच्या दोन टक्के रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करावी लागते. आता काही औषध कंपन्यांना ही रक्कम सामाजिक उपक्रमांवर खर्च करण्याऐवजी करोनावरील लस आणि औषध तयार करण्याच्या संशोधनावर खर्च करता येऊ शकणार आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयामुळे औषध कंपन्यांना करोनावरील संशोधनावर अधिक निधी खर्च करता येणार आहे. त्याचबरोबर कंपनी व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या एका दुसऱ्या दुरुस्तीनुसार, इतर कंपन्यांनी जर लस विकसित करणाऱ्या कंपन्या किंवा संस्थांना निधी दिला तर तो सामाजिक दायित्वावरील खर्चाचा भाग समजण्यात येणार आहे.
मात्र हे बदल केवळ पुढील तीन वर्ष राहणार आहेत. कंपनी व्यवहार मंत्रालयाने केलेल्या दुरुस्त्यामुळे करोनावरील लस आणि औषध संशोधनाला चालना मिळेल असे या कंपन्यांनी या दुरुस्त्यांचे स्वागत करताना सांगितले.





