‘श्रावणबाळ’ योजनेत तब्बल 10 वर्षांनंतर बदल
शासनाकडून योजनेतील अनुदानात 400 रुपयांची वाढ
नीरा – श्रावण वृद्धापकाळ योजनेचे निकष तब्बल 10 वर्षांनंतर बदलले आहेत. 2009 मध्ये शासनाने अनुदानात 100 रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर आता यामध्ये 400 रुपये अनुदानात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने अधिवेशनात वयाचा भेदभाव न करता सरसकट 600 वरून हे अनुदान थेट एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निणर्याचे स्वागत राज्यभरातील “थरथरत्या हातां’कडून होत आहे.
श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता 600 वरून 1 हजार करण्यात आले आहे. विधवा महिलांना एक अपत्य असल्यास 1100, दोन अपत्य असल्यास 1200 रुपये दरमहा मिळणार आहेत. दि. 20 ऑगस्टला शासनाने सरकारने “श्रावण बाळाची’ भूमिका बाजावल्याची प्रतिक्रिया यासाठी संघर्ष करणारे श्रावण बाळ माता पिता सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर तसेच सामाजिक कार्यकर्ते व नरवीर राजे उमाजी नाईक सामाजिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष संजय चव्हाण यांनी व्यक्त केली.
या योजनेसाठी लागणाऱ्या प्रचंड अनुदानाची तरतूद करणे हे सरकार पुढे आव्हान होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे धाडस दाखवत दि. 20 ऑगस्टला या क्रांतिकारी निर्णयावर शिक्कामोर्तब केले. श्रावणबाळ योजनेच्या 20 लाखांहून अधिक वृद्धापकाळ योजनेच्या 11 लाख, विधवा, दिव्यांग, परित्यक्ता अशा 32 लाखांहून अधिक व्यक्तींना याचा लाभ मिळणार आहे. तसेच संजय गांधी समित्यांच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्याची निवड होणार असून प्रत्येक महिन्याला बैठक घेणे बंधनकारक आहे. बैठकांचे व्हिडीओ चित्रीकरण होणार असल्याने प्रकरणाच्या दप्तरदिरंगाईला चाप बसणार आहे. दारिद्रयरेषेच्या 2002च्या यादीत नाव असलेल्या 64 वर्षावरील सर्व व्यक्ती केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेसाठी पात्र असून सद्यस्थित 11 लाखाहून अधिक व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत.
दारिद्रय रेषेच्या यादीत नाव नसणाऱ्या परंतु 21 हजाराचे उत्पन्न असणाऱ्या 64 वर्षावरील सर्व व्यक्ती श्रावणबाळ योजनेसाठी पात्र आहेत. सध्या, 20 लाखांहून अधिक व्यक्ती लाभार्थी आहेत. विशेष म्हणजे लाभार्थीस सज्ञान मुले किंवा शेती असली तरी या योजनेत पात्र आल्याची माहिती राजेंद्र निंबाळकर तसेच संजय चव्हाण यांनी दिली.
शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.
-संजय चव्हाण, अध्यक्ष, नरवीर राजे उमाजी नाईक ट्रस्ट, गुळुंचे





