पुणे | श्री गणेश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अनेक मार्गांत बदल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विविध गणेश मंडळांच्या गणरायाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शनिवारी (७ सप्टेंबर) मध्यभागात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंडळांकडून मिरवणुका काढण्यात येतात. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात श्रींची मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत असल्याने डेंगळे पूल ते शिवाजी पूल,
कसबा पेठ, जिजामाता चाैक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात वाहतूक मार्गांत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.
बंद असलेले मार्ग आणि पर्यायी मार्ग
१. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
२. संचेती चौकाकडून छत्रपती शिवाजी रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून (माॅडर्न कॅफे चौक), जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.
३. सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत.
४. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
५. छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन स्वारगेटकडे जाणाऱ्य पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. स. गो. बर्वे चाैक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे बस जातील.
६. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.
मध्यभागातील वाहतुकीस खुले रस्ते
– फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक
– आप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक
– मंगला चित्रपटगृहसमोरील प्रीमिअर गॅरेज गल्ली ते खुडे चाैक (डेंगळे पूल)
या ठिकाणी उभी करता येणार वाहने
– कामगार पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी पुतळा चौक यादरम्यान एका बाजूला.
– महापालिका वीजभरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा चाैक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी.
– टिळक पूल ते भिडे पूल या मार्गावर नदीपात्रातील रस्त्यावर
– मंडईतील सतीश मिसाळ वाहनतळ, हुतात्मा बाबू गेनू वाहनतळ येथे
– शाहू चाैक (फडगेट पोलीस चौकी) ते राष्ट्रभूषण चौक दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी





