करोनानंतर जगभरात शिक्षण पद्धतीत बदल अटळ

डॉ. मंगेश कराड : फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे – करोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे जगातिक शिक्षण पद्धतीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यापीठाने व विद्यार्थ्यांनी आपली मानसिकता बदलावी लागेल. बदलत्या तंत्रज्ञाननुसार भविष्यात संशोधन, नवनिर्मिती आणि कलात्मता हे गुण असलेले विद्यार्थ्यी घडविण्याची गरज असून त्याला पूरक ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करण्याची आवश्यकता आहे, असे मत एमआयटी आर्ट, डिझाइन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी फेसबुक लाइव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यक्त केली.
भविष्यात तंत्रज्ञान व इतर शाखेच्या शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. तसेच सर्व महाविद्यालय आणि विद्यापीठाने संशोधन आणि संशोधक निर्माण करण्याच्या कामावर जोर द्यावा. येणारा काळ आर्थिक मंदीचा असेल. परिणामी, खाजगी आणि सरकारी विद्यापीठांचे अर्थकारण कोसळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करावी लागेल. करोना व्हायरसच्या नंतरची परिस्थिती ही संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक संधी आहे. त्यांना केवळ प्रशिक्षित शिक्षकांच्या शिक्षणाची गरज भासेल.
ऑनलाइन शिक्षणाकडे सरकारने लक्ष द्यावे
कोविडनंतर शिक्षणाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल येणार आहे. टेक्नॉलॉजीनिर्मित कंपन्यांनी काही ऑनलाइन कोर्सेस डिझाइन करावेत. स्वयंमसारखे पोर्टल सुरू करावे. टेक्नॉलॉजी इक्युबेशन सेंटर उभारून संशोधक विद्यार्थी घडविण्याची गरज असल्याचे डॉ. कराड यांनी म्हटले आहे.





