पिंपरी – परीक्षा पास होऊन तुम्ही व्यावहारीक जगात प्रवेश करणार आहात. आयुष्यात नोकरी, व्यवसाय करून स्थिरावणे हे आता तुमचे उद्दीष्ट असेल. मात्र, असे जरी असले तरी कायम विद्यार्थ्याच्या भूमिकेत रहा, नव्या गोष्टी आत्मसात करा. बदलत्या काळाबरोबर स्वतःत बदल करत रहा, असे केलेत तर तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन लेखक चेतन भगत यांनी केले.
डॉ. डी. वाय. पाटील बी स्कूलच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ विद्यापीठ मुख्यालयातील सभागृहात पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून चेतन भगत बोलत होते. या कार्यक्रमाला प्रसिद्ध प्रशिक्षक आणि आध्यात्मिक मार्गदर्शक खुर्शीद बाटलीवाला आणि ध्यानधारणा विषायातील तज्ज्ञ आणि उपयोजित उपचारतज्ज्ञ दिनेश घोडके उपस्थित होते.
या वेळी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू डॉ. भाग्यश्री पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन. जे. पवार, डॉ. रोहिणी पाटील, संचालक डॉ. अमोल गावंडे, अधिष्ठाता डॉ.अतुलकुमार आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना चेतन भगत यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन आणि भाषण यांच्या माध्यमातून 11 सूत्रे समजावून सांगितली. मोठ्या ध्येयाचे छोटे छोटे टप्पे तयार करा. ते पार करण्याचा प्रयत्न करा. कितीही शिकलात तरी लोकाशी संवाद साधण्याचे कसब कोणत्याही विद्यालयात मिळत नाही ते आत्मसात करावे लागते, असे भगत म्हणाले.