पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपायुक्तांसह सहाय्यक आयुक्तांची आज (दि. 13) आयुक्तांनी खांदेपालट केली. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्यांना धक्का तर दिलाच परंतु अवघ्या काही महिन्यांपूर्वी ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या त्यांचेही विभाग बदलण्यात आले आहेत. यामुळे या बदल्यांबाबत उलट सुलट चर्चा रंगली आहे. ठराविक मर्जीतील अधिकाऱ्यांना “चांगले’ विभाग देतानाच काही कार्यक्षम अधिकाऱ्यांना प्रवाहाबाहेरच्या विभागांमध्ये फेकण्यात आले आहे. आजच्या बदल्यांमुळे स्थानिक आणि शासकीय अधिकारी असा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आयुक्त तथा प्रशासक म्हणून शेखर सिंह हे महापालिकेत रुजू झाल्यापासून बदल्यांचे सत्र सुरू झाले ते 9 महिन्यांनंतरही सुरूच आहे. या कालावधीत अनेक अधिकाऱ्यांचे विभाग बदलण्यात आले आहेत. तर आजच्या बदल्यांमध्ये काही महिन्यांपूर्वी बदलले विभाग त्यांना बहाल करण्यात आले आहेत. आज बदली झालेल्यांमध्ये उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्याकडील नागरवस्ती विभागाचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे कायदा विभाग कायम ठेऊन आपत्ती व्यवस्थापन हा विभाग देण्यात आला आहे. उपायुक्त सचिन ढोले यांच्याकडे भूमी आणि जिंदगी, विशेष नियोजन प्राधिकरण आणि अतिक्रमण निर्मूलन हे विभाग देण्यात आले आहेत.
उपायुक्त स्मिता झगडे यांना प्रवाहाबाहेरचा रस्ता दाखविताना यांच्याकडील स्थानिक संस्था कर हा विभाग काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्र हा विभाग देण्यात आला आहे. सुभाष इंगळे यांच्याकडील उद्यान विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडील कामगार कल्याण विभाग कायम ठेवण्यात आला आहे. अजय चारणठणकर यांना त्यांच्या आवडीचा समाज विकास विभाग सोपविण्यात आला असून त्यांच्याकडील आरोग्य हा विभाग सहायक आयुक्त विनोद जळक यांना देण्यात आला आहे. उपायुक्त मनोज लोणकर यांच्यावर आयुक्तांनी विश्वास दाखवितत्यांच्याकडील मध्यवर्ती भांडार हा विभाग कायम ठेवत क्रीडा विभागाची अतिरिक्त जबाबदारीही दिली आहे.
उपायुक्त संदीप खोत यांची शिक्षण विभागातून गच्छंती करण्यात आली असून त्यांच्याकडे पशू वैद्यकीय हा विभाग सोपविण्यात आला आहे. तर विजयकुमार थोरात यांची शिक्षण विभागात वर्णी लावण्यात आली आहे. थोरात यांच्याकडेच अग्निशमन विभाग कायम ठेवण्यात आला आहे. सहायक आयुक्त रविकिरण घोडके यांच्याकडील जबाबदारी वाढविण्यात आली असून त्यांच्याकडील माहिती व तंत्रज्ञान हा विभाग कायम ठेवून त्यांच्याकडे उद्यान विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांच्याकडील झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभागाचा पदभार काढून त्यांना ह क्षेत्रीय कार्यालयात पाठविण्यात आले आहे. या विभागाचा अतिरिक्त पदभार सहायक आयुक्त अण्णा बोदाडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रशांत जोशी यांच्याकडे आकाशचिन्ह व परवाना, उमाकांत गायकवाड यांच्याकडे स्थानिक संस्था कराची जबादारी सोपवितानाच ड क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार कायम ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या निलेश देशमुख यांच्याकडे करसंकलनची जबाबदारी कायम ठेवण्यात आली असून अभिलेखा कक्षाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राजेश आगळेयांच्याकडे इ क्षेत्रीय कार्यालय कायम ठेवून त्यांच्याकडील अतिक्रमण निर्मुलनची जबादारी काढून घेण्यात आली आहे.
झगडे, इंगळे यांचे महत्त्व घटले
महापालिकेमध्ये उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या स्मिता झगडे यांची काही महिन्यांपूर्वीच पदोन्नतीने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांना महापालिकेत रुजू करून घेण्यात आले नव्हते. त्याविरोधात स्मिता झगडे या मॅटमध्ये गेल्या होत्या. मॅटमध्ये त्यांच्या बाजूने निकाल लागल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाला आव्हान देण्यात आले आहे. त्यातच राज्य शासनाने त्यांची अतिरिक्त आयुक्त पदावरून उपायुक्त म्हणून पदावनतीही केल्यामुळे सध्या झगडे या महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. करसंकलन, सुरक्षा या सारख्या महत्त्वाच्या विभागात काम करणाऱ्या झगडे यांच्याकडे सध्या नागरी सुविधा केंद्रांची जबाबदारी देण्यात आल्याने त्यांचे महत्त्व घटले असून असाच काहीसा प्रकार उपायुक्त सुभाष इंगळे यांच्या बाबतीतही घडला आहे. प्रशासन विभाग, उद्यानसह इतर महत्त्वाच्या विभागाचा पदभार सांभाळणाऱ्या इंगळे यांच्याकडे कामगार कल्याण हा विभाग सोपविण्यात आल्याने त्यांचेही महत्त्व घटविण्यात आल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
आयुक्तांचा प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांवरच “विश्वास’?
महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या उपायुक्त आणि सहायक आयुक्तांना जबाबदारीचे विभाग सोपविण्यात आल्याने महापालिका आयुक्तांची शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवरच अधिक विश्वास आहे का? असा प्रश्न या बदल्यांमुळे निर्माण झाला आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे कमी महत्त्वाचे विभाग सोपविण्यात आल्याचेच आजच्या बदल्यांवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शासनाकडील अधिकारी आणि महापालिकेचा अधिकारी हा वाद पुन्हा एकदा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चंद्रकांत इंदलकर यांच्यावर अन्याय
महापालिकेचे उपायुक्त असलेल्या चंद्रकांत इंदलकर यांच्याकडे सहआयुक्त पदाचा पदभार सोपवितानाच आयुक्तांनी त्यांच्याकडील समाजविकास हा विभाग काढून घेतला आहे. अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच हा विभाग इंदलकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. मात्र, अनपेक्षितपणे हा विभाग त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याने इंदलकर यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांनी याबाबत आयुक्तांकडे आपले लेखी म्हणणे मांडतानाच बदलीबाबत लेखी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा रंगली होती.