नवी दिल्ली – पेट्रोलियम मंत्रालयात चेहराबदल झाला असला तरी इंधन दरवाढ कायम राहिली आहे. सार्वजनिक इंधन कंपन्यांनी गुरूवारी लिटरमागे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे 35 आणि 9 पैशांची वाढ केली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर हरदीपसिंग पुरी यांना पेट्रोलियम मंत्री बनवण्यात आले. त्यांनी नवा पदभार स्वीकारल्याचा दिवसही इंधन दरवाढीला अपवाद ठरला नाही. मे महिन्यापासून इंधन दरवाढीचे सत्र सुरू झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या दरात 37 वेळा, तर डिझेलच्या दरात 35 वेळा वाढ झाली. त्या दरवाढींमध्ये मिळून पेट्रोल 10.16 रूपयांनी, तर डिजेल 8.89 रूपयांनी महागले. त्यामुळे महाराष्ट्र, दिल्लीसह 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत पेट्रोलचे दर याआधीच 100 रूपयांवर गेले आहेत. राजस्थान, ओडिशा आणि मध्यप्रदेश या 3 राज्यांत तर डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. भरमसाठ इंधन दरवाढीमुळे देशातील जनता त्रस्त असताना पेट्रोलियम मंत्रालयाची धुरा नव्या मंत्र्याकडे गेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराआधी धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम मंत्री होते.