Mangesh Jinnah : सध्याच्या घडीला राजकारणामध्ये जे काही सुरू आहे ते पाहून भविष्यातील राजकारण कशा प्रकाराचे असू शकते याचा अंदाज लावता येतो. सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राज्यातील २९ महापालिकांमध्ये निवडणुकीचा माहोल आहे. सर्वच महापालिकांमध्ये तगडे उमेदवार देण्यात आले असल्याचा बोलबाला राजकीय पक्षांकडून केला जात आहे. पण अकोला महापालिका निवडणुकीत एक सर्वसामान्य तरुणाला उमेदवारी देण्यात आल्याने आणि हा तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने चर्चेचा विषय ठरत आहे.

राजकारणात पैसा, ताकद घराणेशाही आदी गोष्टींना महत्व दिले जात असल्याच्या समजूती दूर सारून अकोला महापालिका निवडणुकीच्या रिंगणात मंगेश झिने या वीजबीलाचे वाटप करणाऱ्या तरुणाला उमेदवारी देण्यात आली आहे. मंगेश हा प्रभाग क्रमांक 20 मधून भाजपकडून निवडणूक लढवत आहे. सर्वसामन्य कुटुंबातील तरुणाला उमेदवारी दिल्याने शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. मंगेश झिनेचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संघर्ष करत जगत आहेत. त्याची आई धुणीभांडीची काम करत आहे. तर वडील चौकीदाराचे काम करत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून मंगेश झिने हा प्रामाणिकपणे वीज बिल वाटपाचे काम करायचा मग अचानक त्याच्या आयुष्यात थेट निवडणूक लढविण्याची संधी चालून आली. मंगेशला स्वतःलाही आपण कधी नगरसेवकपदाचा उमेदवार होऊ, याची कल्पनाही नव्हती. मात्र, मंगेशला उमेदवारी मिळाली असून प्रभाग क्रमांक 20 मधून अनुसूचित जातीसाठी राखीव जागेवरून त्यांना संधी देण्यात आली आहे.

महत्वाचे म्हणजे भाजपकडून सर्वच महापालिका निवडणुकीत तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले जात आहेत. दुसरीकडे भाजपने चार वेळा नगरसेवक राहिलेल्या विजय इंगळे यांचा पत्ता कट करत मंगेश झिनेला संधी दिली आहे. मंगेशकडे प्रचारासाठी पुरेसे आर्थिक बळ नसल्याने कार्यकर्ते, समर्थक आणि इतर उमेदवार वर्गणी काढून त्याचा प्रचार करत आहेत. त्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत मंगेश झिने या सर्वसामान्य घरातील तरुणाला लोकं कसा प्रतिसाद देतात याचे उत्तर १६ जानेवारीला मिळणार आहे.

हेही वाचा : मोठी बातमी ! अमेरिकेत FBI ने उधळला दहशतवादी कट ; सापळा रचून ISIS च्या संबंधित व्यक्तीला केली अटक