चिंचवडगावातील वाहतुकीमध्ये उद्यापासून बदल

पिंपरी – चापेकर चौक येथील रस्त्याचे महापालिकेच्यावतीने काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. उद्या (गुरुवार) पासून याबाबत अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
महापालिकेच्यावतीने चापेकर चौकात सुशोभीकरण तसेच रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या कामाचा पुढील टप्पा म्हणजे मोरया हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करावी लागणार आहे. यामुळे मोरया हॉस्पिटलकडून येणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. मात्र मोरया हॉस्पिटलकडे जाणारी वाहतूक सुरळीत राहणार आहे.
मोरया हॉस्पिटलकडून चापेकर चौकात येणारी वाहने पॉवर हाऊस चौकातून भोईर आळी येथून चापेकर चौकात येणार आहे. गुरूवार (दि. 7) पासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार आहे. 20 दिवसांकरिता हा बदल असणार आहे.
महापालिकेकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पूर्ववत केली जाणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.





