चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे भाजपमधील नाराजी अजूनही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले. सपना टॉकीज चौकातील सभेत भाजपकडून तिकीट नाकारलेले राकेश बोमनवार हे बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच मला साहेबांशी बोलायचे आहे म्हणत थेट व्यासपीठावर पोहोचले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे क्षणभर गोंधळ उडाला. बावनकुळे यांनी प्रसंगावधान राखत भाषण थांबवले आणि विनोदी टिप्पणी करत वेळ मारून नेली. मात्र, बोमनवार व्यासपीठावरून खाली उतरण्यास तयार नसल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना खाली जाण्याचे सांगितले. अखेर कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत बोमनवार यांना सभास्थळाबाहेर नेले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. अशोक उईके व भाजप उमेदवार उपस्थित होते. उमेदवारीवरून सुरू झालेला भाजपतील नाराजीचा सूर आता प्रचारकाळातही कायम असल्यामुळे नेते चिंतित असल्याचे चित्र बघायला मिळाले.