मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले,’पवार यांनी केलेलं हे वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं आहे. तर याबाबत अजित पवार यांनी महाराष्ट्राची माफी मागावी असेही बावनकुळे म्हणाले. इतकेच काय तर बावनकुळे यांनी अजित पवार हे धरणवीर आहेत.’ असा टोलाही लगावला आहे. तसेच, औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी त्यांचा छळ केला. तेव्हा धर्माचं रक्षण करणारे संभाजीराजे होते. कितीही अत्याचार केला गेला तरी त्यांनी धर्म सोडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने आता मुघलशाही स्वीकारली आहे. ती राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी करत अजित पवारांचा पुतळा जाळला. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका करत ठिकठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे.