Chandrasekhar Bawankule । वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. आजपर्यंत या मंदिराला लाखी रामभक्तांनी भेट देऊन प्रभुरामाचे दर्शन घेतले आहे. मात्र याच मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नावर आता भाजपकडून उत्तर देण्यात आले आहे. मात्र उत्तर देतं भाजपने सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केलीय.
राम मंदिराविषयी शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी सवाल केला कि, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल का? यावर शरद पवार यांनी एका बैठकीतील घटना सांगितली. शरद पवार म्हणाले, एका बैठकीत काही महिलांनी एक तक्रार माझ्यापुढे मांडली. त्या महिला म्हणाल्या, हे लोक (भाजपा) रामाचं (श्रीराम) सगळं करतात, पण मंदिरात सीतेची मूर्ती का बसवत नाहीत?
शरद पवार यांच्या या वक्तव्यावर भाजपने आक्षेप नोंदवलाय. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात.
राम मंदिरात सीतामाईंची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात.
शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 19, 2024
बावनकुळे यांनी म्हटलं आहे की, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत पण पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. बरं, जे शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणं म्हणजे ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल.